नांदेड - प्रेम आंधळे असते, असे म्हणतात. ते अनेक प्रसंगातून समाजासमोर येत असतेच, असाच एक प्रकार लोहा तालुक्यातील किरोडा गावात घडला. विवाहित २० वर्षीय तरुणीने स्वतःच्याच म्हणजे माहेरघरी चोरी केली आणि आपल्या प्रियकरासोबत तिने धूम ठोकली. आदेश खरे (वय 23) असे त्या प्रियकराचे नाव आहे. हे सगळं प्रकरण लोहा पोलीस ठाण्यात आले. यानंतर तपासाची चक्रे जोरात फिरली आणि विवाहित तरुणी व प्रियकराला अटक करण्यात आली आहे. या दोघांनाही आज न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सदरील विवाहितेचा पती हा शेती करत असून, गावातीलच एका मुलीशी त्याचा विवाह झाला होता. पण आधीपासूनच त्या मुलीचे दुसऱ्या एका मुलावर प्रेम होते. किरोडा येथील माहेरच्या घरी आल्यानंतर घरामध्ये असलेल्या पेटीतील १ लाख ६५ हजार ५०० रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि ७ हजार रोख रक्कम, असे एकूण १ लाख ७२ हजार रुपयांचा ऐवज सदरील तरुणीने पळवले. सोबतच प्रियकरही फरार झाला.
या घटनेची माहिती त्या तरुणीच्या आईला समजताच तिने थेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलीस निरीक्षक भागवत जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सदर तरुणीचा शोध घेतला. त्यानंतर तिला प्रियकरासह ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्या तरुणीची अधिक चौकशी केली असता, तिने आपल्या प्रियकरासोबत कट रचून आपल्याच घरात चोरी केल्याची कबुली दिली. या प्रकरणी द्रोपदाबाई माने यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी विवाहित तरुणी व प्रियकर आदेश खरे यांच्याविरुद्ध लोहा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. लोहा न्यायालयासमोर त्यांना उभे केले असता न्यायालयाने एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.