नांदेड - जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात शुक्रवारी सायंकाळपासून जोरदार पाऊस सुरु असल्याने पैनगंगा नदीकाठचे अनेक मार्ग बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे पावसामध्ये बस अडकल्याने बसमधील विद्यार्थांना मंदिरातच कुडकुडत रात्र जागून काढावी लागली आहे.
शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता शाळा सुटल्यानंतर येथील हुतात्मा जयवंतराव पाटील आणि राजा भगीरथ शाळेतील मुलींना घेऊन जाणारी बस अनेक नाले पार पुढे गेली. मात्र, खैरगावच्या नाल्यावरून कमरेहून जास्त पाणी वाहू लागल्याने वेळीस बस चालकाने प्रसांगावधान राखले. व बस पुढे न नेता परत हिमायतनगरकडे आणली. आणि बसमधील शेकडो मुलींना येथील श्री परमेश्वर मंदिरात सोडले. या बसमध्ये जवळपास शंभरच्यावर मुली होत्या.
त्यामुळे या पावसामुळे चिमुकल्यांना मंदिरातच कुडकुडत रात्र जागून काढावी लागली. तर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पैनगंगा नदीकाठच्या बोरगडी, वारंगटाकळी, मंगरूळ, खैरगाव परिसरातील नाले तुडुंब भरून वाहत आहेत. त्यामुळे वाहतूक बंद होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे.
यानंतर रात्री मंदिर कमेटी, गावातील स्वयंसेवक युवक, शाळेचे शिक्षक यासह सर्वांनी मुलींच्या जेवणाची सोय केली. तरी रात्री घराकडे परत जाता न आल्यामुळे अनेक चिमुकल्यांचे चेहरे हिरमुसून गेले होते. तर बसमध्ये एकाच वेळी १०० च्या वर विद्यार्थी असल्यामुळे एकाच गाडीमध्ये या प्रकारे भार असतो शासनाने आणखी २-३ गाड्या वाढवाव्यात, असे बसचे चालक एल. आर. जाधव यांनी सांगितले आहे.