नांदेड - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार डॉ. सुनील कदम यांनी काँग्रेसने पाठिंबा दिलेल्या हरिहरराव भोसीकर या राष्ट्रवादीच्याच उमेदवाराचा ११ विरुद्ध ९ मताने पराभव केला. यामुळे जिल्हा बँकेवर पुन्हा महाआघाडीचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे.
तीन वर्षापूर्वी महाआघाडीने जिल्हा बँकेची निवडणूक लढविली होती. या निवडणूकीत त्यांनी १५ जागा पटकावून बहुमत प्राप्त केले होते. पहिल्यावर्षी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर हे या बँकेचे अध्यक्ष झाले. मात्र, गतवर्षी या आघाडीत फुट पडून राष्ट्रवादीचे दोन गट पडले. यामुळे दिनकर दहिफळे हे राष्ट्रवादीचे उमेदवार काँग्रेसच्या पाठिंब्याने ११ विरुध्द १० मताने विजयी झाले होते.
नांदेड जिल्ह्यात काँग्रेसचे लोकसभा निवडणुकीत पानीपत झाल्यानंतर या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. महाआघाडीच्या वतीने डॉ. सुनील कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. काँग्रेसचा पाठिंबा घेत राष्ट्रवादीचेच उमेदवार हरिहरराव भोसीकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सकाळी ११ वाजता अर्ज दाखल केल्यानंतर दुपारी बारा वाजता मतदान घेण्यात आले. या सभेला २१ पैकी २० सदस्य उपस्थित होते. माजी खासदार तथा बँकेचे संचालक भास्करराव पाटील खतगावकर हे आजारी असल्यामुळे ते अनुपस्थित होते. या निवडणुकीत डॉ.सुनील कदम यांना ११ तर हरिहरराव भोसीकर यांना ९ मते मिळाली. महाआघाडीची राष्ट्रवादीची चार मते फुटल्यामुळे काँग्रेसचे पाच व फुटलेल्या गटाचे चार अशी नऊ मते भोसीकर यांना मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी फडणीस यांनी डॉ. सुनील कदम हे विजयी झाल्याचे घोषित केले.