नांदेड - नवरात्रोत्सव आला की राज्यातील देवींच्या साडेतीन शक्तीपीठांकडे भाविकांची पावले आपोआप वळतात. राज्यातील कोल्हापूर, तुळजापूर, माहूर आणि नाशिक याठिकाणी देवीची साडेतीन शक्तीपीठे आहेत. या सर्वच तीर्थक्षेत्रांना मोठा मान आहे. ही सर्वच स्थळे जागृत मानली जातात. त्यामुळे भाविक मनोभावाने या स्थळांना नेहमीच भेटी देतात. नवरात्रोत्सवात येथे जास्त गर्दी बघायला मिळते. ७ ऑक्टोबरपासून राज्यातील मंदिरे सुरु असल्यामुळे साहजिकच माहूरगडचा यंदाचा शारदीय नवरात्रोत्सव हर्षोउल्हासात आणि भक्तांच्या गर्दीत होईल, अशी अपेक्षा होती. पण दररोज १६ हजार भाविकांनाच प्रवेश मिळणार आहे. त्यातच पास असल्याशिवाय प्रवेश मिळणार नसल्यामुळे भक्तांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे.
उंच पर्वतरांगा आणि निसर्गाच्या सानिध्यात रेणुकामातेचे मंदिर
देवीच्या साडेतीन शक्तीपीठापैकी मूळ पीठ म्हणून तीर्थक्षेत्र माहूरची ओळख आहे. पौरोणिक ग्रंथात कोरी भूमी असा उल्लेख असलेल्या या माहुरला निसर्गाने मुक्त उधळण केली आहे. माहूरच्या तीर्थ क्षेत्रावरील उंच पर्वतरांगा आणि त्यावरची घनदाट हिरवळ हे नयनरम्य दृश्य आहे. ढगांना हात पोहोचेल की काय इतक्या उंचावर येथे रेणुका मातेचे वास्तव आहे. रेणुका मातेच्या या मंदिरात जाण्यासाठी घनदाट जंगलाच्या घाटातून प्रवास करावा लागतो. त्यानंतर शेकडो पायऱ्या चढून गेल्यावर मातेचे दर्शन होते. हजारो भाविक या पायऱ्या ओलांडून माता दर्शनाला येतात. निसर्गाने येथे हिरव्या रंगाची मुक्त हस्ते उधळण केली आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे भक्त निसर्ग सौंदर्याचा अविष्कार येथे येऊन प्रत्यक्ष पाहू शकले नाहीत.
नवरात्रीत असते लाखो भाविकांची गर्दी
माहूर गडावर नवरात्री महोत्सवात लाखो भाविक येत असतात. महोत्सवाच्या १० दिवसात संपूर्ण महाराष्ट्रासह शेजारच्या आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा आदी राज्यासह देशभरातून दररोज लाखो भाविक रेणुका मातेच्या दर्शनासाठी माहूर येथे येत असतात. यामध्ये ललित पंचमी, नवरात्रीतील मंगळवार, शुक्रवार व रविवार या दिवशी भाविकांची दर्शनासाठी गर्दी होते. अश्विन पौर्णिमेला तर भाविकांची प्रचंड गर्दी असते. शिवाय घटस्थापनेपूर्वी दिपज्योत नेण्यासाठीही युवकांची मोठी गर्दी होते.
माहूर गडावरील अनेक कार्यक्रम रद्द
नवरात्रोत्सवात येथे जास्त गर्दी बघायला मिळते. माहूरगडावरील नवरात्र महोत्सव यंदाही भक्तांविनाचा होतो की काय अशी चिंता भक्तांना होती. त्यामुळे याबाबत काय निर्णय होतो, याकडे लाखो भाविकांचे लक्ष लागले होते. परंतु शारदीय नवरात्रोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने व भाविकांविना साजरा होणार आहे. माहूरगडावरचे अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
लघु व्यावसायिक गेल्या दोन वर्षांपासून अडचणीत
७ ऑक्टोबरपासून राज्यातील मंदीरे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे भाविकांच्या गर्दीत माहूर गडावर नवरात्र महोत्सव होणार हे स्पष्ट झाल्यानंतर भाविक आणि हातावर पोट असणाऱ्या लघु व्यावसायिक आणि पुजाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या बैठकीत अनेक नियम घालून दिले आहेत. त्यामुळे साहजिकच भाविकांची संख्या कमी होईल आणि लघुव्यावसायिकांच्या व्यवसायावर याचा परिणाम होणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा
कोविड - 19 चा प्रादुर्भाव वाढू नये, या उद्देशाने साथरोग कायदा व आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत जिल्ह्यातील बंद असलेली धार्मिक स्थळे आणि सार्वजनिक प्रार्थनास्थळे येत्या 7 ऑक्टोंबरपासून अटी व शर्तीच्या आधीन राहून उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. याबाबत नांदेड जिल्ह्यातील माहूर येथील नवरात्र उत्सवबाबत असलेली महती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज (बुधवारी) माहूर येथे प्रत्यक्ष भेट देवून आढावा घेतला. विश्वस्तासमवेत झालेल्या आढावा बैठकीत दर्शनाला येणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी ऑनलाइन प्रवेश पत्रिका घेण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. ही प्रवेशिका https://shrirenukadevi.in/ या संस्थानच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ज्या भाविकांना ऑनलाइन प्रक्रियेत सहभाग घेता येत नाही. त्याच्यासाठी टी-पाईट माहूर येथे ऑफलाइन पासेसची सोय उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली आहे.
'या' कालावधीत मंदिर खुले राहणार
नवरात्र काळामध्ये भाविकांच्या सोयीसाठी पहाटे 5 ते रात्री 10 पर्यंत रेणूका देवी मंदिर खुले राहील. दर्शनासाठी पास असल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही. याचबरोबर कोविड प्रतिबंधक लसीकरण करुन घेणे आवश्यक आहे. परराज्यातील भाविकांनी लसीकरणाचे दोन डोस घेतल्याबाबतचे प्रमाणपत्र अथवा 72 तासामधील आरटीपीसीआर अथवा 24 तासामधील रॅपीड ॲटीजेन टेस्ट असणे आवश्यक आहे. 65 वर्षावरील व्यक्ती, आजारी व्यक्ती, गर्भवती महिला व 10 वर्षाखालील मुले यांनी नवरात्र काळामध्ये दर्शनासाठी गडावर येऊ नये. त्याऐवजी रेणूका देवी संस्थानच्या वेबसाइटवरुन ऑनलाइन दर्शन घ्यावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. भाविकांना माहूर येथून रेणूका माता मंदिराकडे घेवून जाणे आणि आणण्यासाठी एसटी बसेसची सोय केली आहे.
हेही वाचा - 7 ऑक्टोबरपासून साई मंदिर दर्शनासाठी खुले होणार; दररोज 15 हजार भक्तांनाच प्रवेश