नांदेड ( आरळी ) : आनंदा तुकाराम येडलेवार यांची लक्ष्मी ही तृतीय कन्या आहे. आनंदा येडलेवार यांचे संपूर्ण घर पत्र्याचे आहे. घरात वीजपुरवठा आहे. मात्र उंदराने विजेची एक वायर कुरतडली होती. त्यामुळे विजेचा प्रवाह चोहोबाजूने असलेल्या पत्र्यांमध्ये उतरला. या पत्र्यांना बांधलेल्या ॲल्युमिनियम तारेतही वीज प्रवाह उतरला होता. त्याचवेळी लक्ष्मीचा चुलत भाऊ आदित्य याचा या तारेला स्पर्श झाला आणि जागेवर तो तडफडू लागला. लक्ष्मीने लगेच स्वतःच्या जीवाची पर्वा न करता भावाला तारेपासून अलग करण्याचा प्रयत्न केला. ५ ते ७ मिनिटांच्या प्रयत्नांनी भाऊ बाजूला फेकला गेला आणि लक्ष्मी तारेला चिटकली. त्यातूनही तिने स्वत:ला वाचविले. २१ सप्टेंबर २०२१ रोजीची ही घटना घडली.
मुख्यमंत्र्याहस्ते लक्ष्मीचा सत्कार : लक्ष्मीने छोट्या भावाचे प्राण वाचवले. खतगावच्या मंजुळाबाई हायस्कूलमध्ये सध्या ती आठवी इयत्तेत शिकत आहे. लक्ष्मीच्या शौर्याची माहिती मिळाल्यानंतर रामतीर्थ ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक विजय जाधव यांनी ग्रामस्थांच्या उपस्थितीत लक्ष्मीचा सत्कार केला होता. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी तिचा सत्कार केला.
राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर : शनिवारी लक्ष्मीला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार मिळाल्याचा लक्ष्मीला आनंद झाला. तिला राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना भेटायचे आहे. खूप शिकून डॉक्टर किंवा कलेक्टर व्ह्यायची तिची इच्छा आहे. तिच्या वडिलांना आणि गावकऱ्यांना देखील वाटले नव्हते तिला हा पुरस्कार मिळेल. गावचे नाव देश पातळीवर झळकल्याने तिचे कुटुंब आणि गावकरी आनंदित आहेत. येत्या 26 जानेवारीला दिल्लीत हा पुरस्कार तिला प्रदान केला जाणार आहे.
पुरस्काराचे वितरण २६ जानेवारी होणार : नवी दिल्ली येथील भारतीय बालकल्याण परिषदेच्या वतीने लक्ष्मी आनंदा येडलेवार हिला जाहीर झालेल्या राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराचे वितरण प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी रोजी दिल्ली येथे होणार आहे. लक्ष्मी आपला अनुभव सांगताना म्हणते, आपला भाऊ तारेत उतरलेल्या वीज प्रवाहामुळे तडफडत असल्याचे पाहताच भावाला वाचवायचेच हे ध्येय समोर ठेवून मी प्रयत्न केले. त्यावेळी माझ्या जीवाचाही विचार केला नाही. आज राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाल्याने आनंद गगनात मावेनासा झाला आहे. तिच्या वडिलांनीही समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, लक्ष्मी माझी मुलगी लहानपणापासून धाडसी आहे. गरिबीवर मात करीत शिक्षण घेत, मुलीने स्वतःच्या हिमतीवर कर्तृत्वाची ख्याती सर्वदूर मिळवली, याचा सार्थ अभिमान आहे.
हेही वाचा : जळगावच्या प्रणित पाटीलला बाल शौर्य पुरस्कार जाहीर