नांदेड - कोरोनामुळे गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेली रेल्वेसेवा हळूहळू सुरू होणार आहे. येत्या एक जूनपासून अमृतसर सचखंड एक्सप्रेस धावणार असल्याची माहिती रेल्वे विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. यासाठी आज दिनांक २२ मेपासून नांदेड विभागातील सहा रेल्वेस्थानकांवर आरक्षण केंद्र सुरू करण्यात आल्याचेही सांगण्यात आले.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने लागू करण्यात आलेल्या उपाययोजनांमध्ये रेल्वे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे देशातील सर्वच भागातील रेल्वे बंद होत्या. मात्र, आता ही सेवा हळूहळू पूर्व पदावर आणण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून हालचाली सुरू आहेत. त्यानुसार येत्या एक जूनपासून नांदेड-अमृतसर-नांदेड दरम्यान सचखंड विशेष एक्स्प्रेस धावणार आहे. रेल्वे बोर्डाने कळविल्यानुसार आज दिनांक २२ मे २०२० पासून नांदेड विभागातील सहा रेल्वे स्थानकावर रेल्वे आरक्षण केंद्र पुन्हा प्रवाशांकरिता सुरू करण्यात आले आहे. यात नांदेड, पूर्णा, परभणी, सेलू, जालना आणि औरंगाबाद रेल्वे स्थानकांचा समावेश आहे.
आरक्षण कार्यालयाच्या वेळा पुढीलप्रमाणे -
सकाळी – ०८.०० ते १२.०० वाजेपर्यंत
दुपारी – १४.०० ते १७.०० वाजेपर्यंत
तसेच रेल्वे बोर्डाने दिनांक ०१ जून २०२० पासून देशभर २०० विशेष गाड्या चालविण्याचे ठरविले आहे. यात नांदेड विभागातून नांदेड-अमृतसर-नांदेड दरम्यान सचखंड विशेष एक्स्प्रेस धावणार आहे. ही गाडी दिनांक १ जून रोजी नांदेड येथून गाडी संख्या ०२७१५ नांदेड- अमृतसर विशेष एक्स्प्रेस बनून धावेल. तसेच दिनांक ०३ जूनपासून अमृतसर येथून ही गाडी संख्या ०२७१६ अमृतसर-नांदेड सचखंड विशेष एक्स्प्रेस बनून धावेल. या गाडीस २२ डब्बे असतील. यात वातानुकूलीत तसेच बिगर वातानुकूलीत डब्बे असतील. सामान्य म्हणजेच जनरलचे डब्बे नसतील. या विशेष गाडीच्या वेळा नियमित नांदेड-अमृतसर-नांदेड सचखंड एस्क्प्रेससारख्याच असतील.
महाराष्ट्र सरकारने ठरवून दिलेल्या कोव्हिड-१९ च्या दिशा निर्देशांनुसार महाराष्ट्रातील दोन जिल्ह्याअंतर्गत येणाऱ्या रेल्वे स्थानकादरम्यान प्रवाशांना या विशेष गाड्यांमध्ये प्रवास करता येणार नाही. यापूर्वीच ठरविल्यानुसार श्रमिक विशेष गाड्यांचे नियोजन संबंधित राज्य सरकार करेल. प्रवाशांनी रेल्वे आरक्षण केंद्रावर / रेल्वे स्थानकावर येतांना तसेच रेल्वे गाडीत प्रवास करतांना भारत सरकारने तसेच संबंधित राज्य सरकारने कोरोनाचा प्रसार रोखण्याकरिता दिलेल्या दिशा निर्देशांचे पूर्ण पालन करावे. तसेच ते ज्या राज्यात प्रवासाने पोहोचतील त्या संबंधित राज्याच्या कोरोनाचा प्रसार रोखण्याकरिता दिलेल्या दिशा निर्देशांचे पूर्ण पालन करावे असे निर्देश देण्यात आले आहेत. विशेष गाड्यांमध्ये प्रवेश करण्या पूर्वी प्रवाशांची शारीरिक तपासणी करण्यात येणार नाही. ज्या प्रवाशांना कोरोना (कोविड-19)चे कोणतेही लक्षण नसेल त्यांनाच या रेल्वे गाड्यांत प्रवेश दिला जाणार आहे याची प्रवाशांनी कृपया नोंद घ्यावी. रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन रेल्वे विभागाने केले आहे.