नांदेड - जिल्ह्यात गेल्या वार्षिक सरासरीच्या तुलनेत १०० टक्के पाऊस झाला. परिणामी शहराला पाणीपुरवठा करणारा विष्णुपुरी प्रकल्प १०० टक्के भरला. यामुळे शहराच्या पाणी पुरवठ्याचा विषय मार्गी लागला होता. यावर्षी आतापर्यंत पाण्याची बचत करत मनपाच्या वतीने शहरात ३ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता. विष्णुपुरी प्रकल्प क्षेत्रात पाऊस पडल्याने सध्या धरणातील पाणी पातळी वाढली आहे. यामुळे नांदेड महानगरपालिकेच्या वतीने 28 जून पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सध्या विष्णुपुरी प्रकल्पातील पाणीसाठा १९ दलघमी वरुन २७ दलघमी वर पोहोचला आहे. यामुळे मनपा प्रशासनाने २८ जून पासून शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.
मागील वर्षी पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या ६० टक्के पाऊस झाला होता. त्यामुळे पावसाळा संपल्यानंतरही शहरात टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत होता.मात्र, परतीच्या व अवकाळी पावसाने जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या 100 टक्के पावसाची नोंद झाली. त्यानंतर मनपा प्रशासनाने सुटकेचा श्वास सोडला. या अगोदर शहरात सुमारे ४० टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत होता. गेल्या वर्षी विष्णुपुरी धरणातील पाण्यासह पैनगंगा नदीतील सहा पाळया पिण्याच्या पाण्यासाठी वापरण्यात आल्या होत्या.
यावर्षी आतापर्यंत शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी पैनगंगा नदीच्या दोन पाळ्या वापरण्यात आल्या आहेत, असे मनपा आयुक्त सुग्रीव अंधारे यांनी सांगितले. गेल्या वर्षी गणेश उत्सवापर्यंत पाऊस अत्यंत कमी होता.२ सप्टेंबरनंतर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. त्यानंतर विष्णुपुरी प्रकल्प तुडूंब भरला. इतकेच नव्हे तर गोदावरी पात्रातील लाखो क्युसेक पाणी तेलंगणामध्ये वाहून गेले. त्यानंतर विष्णुपुरी प्रकल्पासह जिल्ह्यातील सर्व प्रकल्प भरल्याने नागरिकांना मुबलक पाणी उपलब्ध झाले.
यावर्षी रोहिणी नक्षत्रात पावसाची सुरुवात झाली. मृग नक्षत्रात पावसाने चांगला जोर धरला. विष्णुपुरी प्रकल्प क्षेत्रात परभणी व इतर भागात चांगला पाऊस झाल्याने प्रकल्पात २७ दलघमी पाणी उपलब्ध झाले आहे.उपलब्ध पाणी शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी वापरल्यास भविष्यात आलेले पाणी साठवून राहील या उद्देशाने प्रशासनाने शहराला तीन दिवसाऐवजी दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.