नांदेड- दक्षिणमध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील खासदारांची बैठक आज विभागीय व्यवस्थापकांच्या उपस्थितीत होणार आहे. नेहमीप्रमाणे ही बैठक वांझोटी न ठरता या बैठकीतून मराठवाड्यातील जिव्हाळ्याच्या मागण्या मार्गी लागाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
येथील प्रलंबित मागण्या रेल्वेच्या महाव्यवस्थापकामार्फत रेल्वे मंत्र्यांपर्यंत यापूर्वीच पोहचविल्या आहेत. वास्तवीक अनेक मागण्या मान्य करणे सहज शक्य आहे. मात्र, संबंधितांकडून याकडे मराठवाड्याच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम होत असते. सध्या मुंबईला जाण्यासाठी असलेल्या नंदीग्राम, देवगिरी आणि तपोवन एक्सप्रेस कमी पडत असल्याने नांदेड-मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस सुरू करण्यात यावी, अशी जुनी मागणी आहे.
नांदेड-श्रीगंगानगर द्विसाप्ताहिक एक्सप्रेस, नांदेड-अमृतसर सुपरफास्ट एक्सप्रेस आदी गाड्या शेगावचे धार्मिक महत्व लक्षात घेता तेथे थांबवाव्यात. निजामाबाद तिरुपती रॉयलसिमा एक्सप्रेस नांदेडपर्यंत वाढवावी, पुण्यासाठी नांदेड-पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस मनमाडमार्गे नियमित सुरू करावी, यासोबतच नांदेड पनवेल एक्सप्रेस पुण्याला ११ तासात पोहचण्याची व्यवस्था करावी आदी मागण्या मराठवाड्यातील जनतेच्या जिव्हाळ्याच्या आहेत. पूर्णा-पटणा एक्सप्रेस आठवड्यातून तीन वेळेस करण्याची शीख भाविकांची मागणी आहे. त्याचप्रमाणे काशीला जाणाऱ्या भाविकाचीही यामुळे सोय होणार आहे.
हिंगोली, वाशिम भागातून मुबईला जाण्यासाठी अकोला-मंबई एक्सप्रेस दररोज करावी. किंवा, अजनी-मुंबई एक्सप्रेस दररोज करावी, अशीही एक मागणी नागरिकांची आहे. संभाजीनगर-अमरावती इंटरसिटी एक्सप्रेस सुरू करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. नांदेड बंगळुरू एक्सप्रेसचा लूझ टाईम कमी करावा ज्यामुळे परळी, लातूर, उदगीर भागाला फायदा होईल. दोन वर्षापूर्वी मंजूर झालेल्या मनमाड- सिकदराबाद रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम करावे, परभणी-मनमाड दुहेरीकरण, पूर्णा येथे लोकोशेड, या मागण्या गेल्या अधिवेशनात मंजूर झाल्या असून त्यासाठी २ हजार १५२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
नांदेड-देगलूर-बिदर या १५६ किमी नव्या रेल्वे मार्गाचे प्रत्यक्ष काम अद्याप सुरू झालेले नाही. यासोबतच काचिगुडा-नारखेड इंटरसिटी-एक्सप्रेस नारखेडऐवजी बडनेराहून वर्धा मार्गे नागपूरपर्यंत वळवावी, नांदेड विभागात डेमो गाड्यांची संख्या वाढवावी, निजामाबाद-पंढरपूर पॅसेंजरला एक्सप्रेसमध्ये रुपांतरीत करून ती एका बाजूला कोल्हापूर तर दुसऱ्या बाजूला करीमनगरपर्यंत वाढविल्यास तेलंगणा-मराठवाडा जनतेला फायदा होणार आहे. यासोबत पूर्णा-पटणा एक्सप्रेस, नांदेड-सांत्रागाछी एक्सप्रेसला भोकर येथे तर, नांदेड-विशाखापट्टनम एक्सप्रेसला धर्माबाद येथे थांबा देण्यात यावा.
मराठवाड्यातील रेल्वे स्थानकामधील निर्माणाधिन कामे पूर्ण करावी, दक्षिणेकडील अधिकाऱ्यांची मनमानी थांबवावी, या मागण्या किमान या बैठकीतून तरी पूर्ण करून बैठकीचे सार्थक करावे, अशी मागणी अरूण मेघराज, प्राचार्य सुरेश नाईकवाड, राजेंद्र मुंडे, हर्षद शहा, शंतनू डोईफोडे, रितेश जैन, डॉ. राजगोपाल कालाणी, संभानाथ काळे, उमाकांत जोशी, किरण चिद्रावार, अमित काचलीवाल, श्रीकांत गडप्पा, दयानंद दिक्षित, श्रीप्रसाद तोष्णीवाल, कादरीलाल हाजमी, नितीन कदम आदींनी ही केली आहे.
प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे आहे...
- मराठवाड्यासाठी स्वतंत्र झोन निर्माण करावा.
- औरंगाबादेत रेल्वेची नवीन पीटलाइन टाकावी.
- नांदेड ते औरंगाबाद डेमो लोकल सुरू करावी.
- नांदेड ते औरंगाबाद स्पेशल रेल्वे कायम करावी.
- विभागातील परभणीसह नांदेड, औरंगाबाद आदर्श रेल्वेस्थानकातील रखडलेली कामे पूर्ण करावीत.
- औरंगबाद ते नागपूर, नांदेड-कोल्हापूर-गोवा एक्स्प्रेस सुरू कराव्यात.
- तपोवन व मराठवाडा एक्स्प्रेसला किमान २४ डबे असावेत.
- मुदखेड-आदिलाबाद, मनमाड-परभणी, परभणी-मुदखेडचे दुहेरीकरण त्वरित करावे.
- मराठवाडा विभागातून थेट सोलापूरला जोडणारी रेल्वे सुरू करावी.
- औरंगाबाद ते लातूर आणि औरंगाबाद ते उस्मानाबाद शहरांना अजूनही रेल्वे सेवेने जोडलेले नाही त्याचा विचार व्हावा.