नांदेड : प्लाझ्मा थेरेपीची सुविधा मोफत सुरू झाल्यानंतर नांदेडकरांसाठी आणखी एक दिलासादायक बातमी आहे. गंभीर अवस्थेतील रुग्णांना उच्च प्रतिच्या उपचारासाठी औरंगाबाद किंवा अन्य ठिकाणी खासगी रुग्णालयात जाण्याची गरज भासणार नाही. नांदेडमध्ये ही सुविधा उपलब्ध झाली आहे. डॉ. अंकुश देवसरकर यांनी हे खासगी रुग्णालय सुरू केले आहे.
नांदेड, हिंगोली, परभणी व लातूर या चार जिल्ह्यातील बाधित रुग्णांसाठी पहिले खासगी कोविड रुग्णालय नांदेडला सुरू करण्यात आले आहे. आशा हॉस्पिटलमध्ये भगवती कोव्हिड सेंटरची स्थापना करण्यात आली असून यापुढे हे रुग्णालय फक्त कोव्हिड रुग्णांसाठी २४ तास उपलब्ध राहणार आहे. राष्ट्रीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या सूचनेनुसार प्रोटोकॉलचे पालन करीत कोरोना रुग्णांवर उपचार केले जाणार असल्याचे डॉ.देवसरकर यांनी सांगितले. जिल्ह्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून, रविवार अखेर (दि.१२) ६१६ रुग्णांची पॉझिटिव्ह म्हणून नोंद झाली. बाधित रुग्णांमध्ये ज्यांना लक्षणे आणि इतर आजारांचा त्रास आहे, असे काही रुग्ण नांदेडमध्ये उपचार न घेता औरंगाबाद, मुंबई, हैदराबाद व इतर महानगरांमध्ये उपचारासाठी जात होते.
हेही वाचा - गेल्या 24 तासात 28 हजार 701 जणांना संसर्ग, तर 500 जणांचा मृत्यू
या बाबींचा विचार करून पालकमंत्री अशोक चव्हाण आणि जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी केलेल्या सूचनेनुसार नांदेडला हे पहिले खाजगी कोव्हिड रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. येथे सोयी-सुविधेसह फक्त कोव्हिड रुग्णांसाठी ५० खाटांची सुविधा उपलब्ध केली आहे. मात्र कोरोनाच्या उपचारासाठी रुग्णाकडून या खासगी हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांची आर्थिक पिळवणूक होणार नाही याकडेही प्रशासनाने लक्ष ठेवण्याची गरज आहे.