नांदेड: शुभांगी हत्या प्रकरणाचा लिंबगावचे ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार या प्रकरणाचा शास्त्रशुद्ध पद्धतीने तपास करीत आहेत. शुभांगीचे प्रेम प्रकरण कुटुंबीयांना मान्य नव्हते. त्यामुळेच तिची सोयरीक करण्यात आली. परंतु प्रियकराच्या डोळ्यांत ही सोयरीक खुपत होती. त्याने नियोजित वराला आपल्या प्रेमसंबंधाची माहिती दिली. त्यामुळे शुभांगीची सोयरीक मोडली. गावात बदनामी झाल्याचा राग तिचे वडील जनार्दन जोगदंड आणि भावाला होता. त्यातूनच त्यांनी शुभांगीचा कायमचा काटा काढण्याचा कट रचला. २२ जानेवारी रोजी शुभांगीच्या आईला गावातीलच मामाकडे पाठविले. त्यानंतर रात्री शुभांगीचा गळा घोटण्यात आला. यावेळी शुभांगीची आई मामाकडे असल्याने तिला साधी कुणकुणही लागली नाही. काही वेळानंतर आरोपींनी शुभांगीचे प्रेत खताच्या पोत्यात भरून शेतात नेले. या ठिकाणी सरणही रचण्यात आले.
आईपासून घटना लपविण्याचा प्रयत्न: सरणाला अग्नी देण्यापूर्वी शुभांगीचा मामा तिच्या आईला घेऊन थेट शेतात पोहोचला. यावेळी शुभांगीच्या वडिलांनी विजेवरील शेगडी पेटवित असताना शॉक लागून शुभांगीचा मृत्यू झाल्याचे तिच्या आईला सांगितले. तसेच अंत्यदर्शन घेण्यासाठी तिच्या आईला फक्त शुभांगीचा चेहरा दाखविला. आरोपींनी शुभांगीचे प्रेत जाळल्यानंतर गावात उलटसुलट चर्चा सुरु झाली होती. ही चर्चा शुभांगीच्या आईच्या कानावर पडू नये, म्हणून जनार्दन जोगदंड हे पत्नीला घेऊन शेतातच मुक्काम करीत होते. आपल्या लेकीचा पित्यानेच खून केल्याचा साधा संशयही शुभांगीच्या आईला आला नाही.
हत्येत पाच नातेवाईकांचा समावेश : शुभांगी जोगदंड हत्या प्रकरणात अनेक बाबींचा उलगडा होणे अद्याप बाकी आहे. त्यादृष्टीने पोलीस तपास करत आहेत. शुभांगीच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. प्रेम प्रकरणातून ही हत्या तिच्याच वडील आणि नातेवाईकांनी केल्याचे समोर आले आहे. यात वडील, भाऊ आणि मामा अशा एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे. एका निनावी फोनमुळे शुभंगीची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. नांदेडच्या शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात शिक्षण घेत होती.
बदनामी झाल्याच्या रागातून हत्या : काही महिन्यांपूर्वी तिचा विवाह ठरला होता. गावातील युवकाशी तिचे प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून तिचा विवाह मोडला होता. समाजात बदनामी झाल्याचा राग मनात ठेवून तिची हत्या करण्यात आली. शुभांगीचे वडील जनार्दन लिंबाजी जोगदंड (वय ४८), भाऊ कृष्णा (१९), गिरधारी (वय ३०), गोविंद (३२) आणि केशव शिवाजी कदम (३७) अशी आरोपींची नावे आहेत. पुरावे नष्ट करण्यासाठी अनेक कुरापती शुभांगीचा गळा अवळण्यापूर्वी आपले हात थरथरू नयेत म्हणून सर्व आरोपींनी अगोदर दारू प्यायली होती.
हेही वाचा: Thane Crime : वर्दळीच्या रस्त्यावरच तरुणावर दोन हल्लेखोरांचा चाकू हल्ला