नांदेड - कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांसाठी जिल्हा प्रशासनाने सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या यात्री निवासमधील काही खोल्या आरक्षित केल्या होत्या. प्रशासनाने या खोल्यांचा वापर देखील केला. मात्र, आता सदर खोल्यांचे भाडे तसेच विद्युत बिल असे एकूण 4 कोटी 76 लाख 13 हजार 680 रुपये आहे. हे बिल मनपाने गुरुद्वारा बोर्डाला द्यावे, अशी मागणी बोर्डाचे अधीक्षक यांनी मनपा आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे. त्यामुळे आता एवढे मोठे बिल पाहून आधीच आर्थिक दृष्ट्या डबघाईला आलेल्या महानगरपालिकेचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे.
कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांना क्वारंटाइन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने गुरुद्वारा बोर्डाकडे यात्रीनिवासच्या खोल्यांची मागणी केली होती. त्यानुसार श्री गुरु गोविंद सिंघजी एनआयआर यात्रीनिवास येथील 145 खोल्या 17 एप्रिलपासून तसेच पंजाब भवन येथील 154 खोल्या 2 मेपासून बोर्डाने प्रशासनाला उपलब्ध करून दिल्या होत्या. येथे २४ तास पाणी, वीज आदीची व्यवस्था करण्यात आली होती. गुरुद्वारा सचखंड बोर्ड ही एक धार्मिक संस्था असून या संस्थेचा सर्व कारभार भाविकांकडून येणाऱ्या देणग्यांद्वारे चालतो.
कोरोनाच्या कालावधीत देशभरात लॉकडाऊन असल्यामुळे भाविक येणे बंद झाले आहे. परिणामी, बोर्डाच्या आर्थिक उत्पन्नात मोठी घट झाली आहे. पूजापाठ, लंगर तसेच कर्मचाऱ्यांचे पगार, विद्युत देयके, साफसफाईची देयके यासाठी बोर्डाला बरीच रक्कम खर्च करावी लागते.
श्री गुरुगोविंद सिंग एनआयआर निवासचे 17 एप्रिल ते 15 जून या कालावधीचे 3 हजार रुपये प्रती खोलीप्रमाणे 145 खोल्यांचे भाडे 2 कोटी 61 लाख तसेच पंजाबभवन यात्रीनिवासचे 2 मे ते 15 जून या 45 दिवसांचे प्रती खोली ३ हजार रुपयेप्रमाणे 2 कोटी 7 लाख 90 हजार आणि विद्युत बिलापोटीचे 7 लाख 23 हजार 680 असे एकूण 4 कोटी 76 लाख 13 हजार 480 रुपये मनपाने गुरुद्वारा बोर्डाला अदा करावे, असे पत्र गुरुद्वारा सचखंड बोर्डाचे अधिक्षक गुरविंदरसिंघ वाधवा यांनी मनपा आयुक्तांना 16 जून रोजी पाठविले आहे.