नांदेड - लगतच्या परभणी जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर नांदेड प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली असून जिल्ह्याच्या सर्व सीमांवरील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या संदर्भात आज(शुक्रवारी) विशेष पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन बंदोबस्ताच्या अनुषंगाने सूचना केल्या.
नांदेड लगतच्या हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे एकाला कोरोनाची लागण झाली होती. जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या निजामाबाद, म्हैसा, बिदर, यवतमाळ, लातूर या जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळले होते. सुदैवाने परभणी व नांदेड जिल्ह्यात आत्तापर्यंत एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नव्हता. परंतु गुरुवारी परभणी जिल्ह्यातील एकाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे.
परभणी जिल्ह्यातील पूर्णा तसेच अन्य भागातून मोठ्या प्रमाणात भाजीपाला उत्पादक व दूध विक्रेते मोठ्या प्रमाणावर नांदेड येतात. आत्तापर्यंत प्रशासनाने राज्याच्या सीमांवर लक्ष केंद्रीत केले होते. परंतु, आता जिल्ह्याच्या सर्व सीमांवरील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. बाहेरील व्यक्तींना जिल्ह्यात प्रवेश करता येवू नये यासाठी जिल्ह्यात १० अंतरजिल्हा चेकपोस्ट तर, १५ आंतरराज्य सीमांवर बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
परभणी येथे रुग्ण आढळून आल्यावर गुरुवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहीया यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. सर्व भागातील अधिकाऱ्यांकडून आढावा घेतल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी महत्वपूर्ण सूचना केल्या. गेल्या २५ दिवसांपासून केलेल्या वेगवेगळ्या उपाययोजनांमुळे जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. तरी आता लगतच्या सर्व जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने पोलीस, महसूल तसेच आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. परभणी जिल्ह्यातून नांदेडला येण्यासाठी पूर्णा, वसमत, आलेगाव हे तीन मार्ग आहेत. त्यामुळे लिंबगाव, अर्धापूर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना दक्ष राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.