नांदेड - मुदखेडच्या रजिस्ट्री ऑफीसमध्ये झालेल्या दीड कोटीच्या मुद्रांक शुल्क घोटाळ्यामध्ये आता अनेक धक्कादायक गोष्टी घडताना दिसत आहे. या प्रकरणी कॉम्प्युटर ऑपरेटरवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. परंतु, नुकसान भरपाईसाठी चक्क जमीन खरेदीदारांकडूनच वसूली प्रक्रिया सुरू केल्याचे दिसत आहे. मुद्रांक शुल्क रकमेचा भरणा एक महिन्याच्या करा, अशा नोटीसा खरेदारांच्या नावे काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे 'मुद्रांक शुल्क भरूनही आम्हाला त्रास का ?' असा सवाल खरेदीदार उपस्थित करत आहेत.
मुदखेड मुद्रांक घोटाळा हा विषय सध्या चर्चेचा बनला असताना यासंबंधीच्या नोटीसा तत्कालीन दस्तनोंदणी केलेल्या प्रत्येक जमीनधारकाच्या हाती पडल्याने खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात सर्वप्रथम मुदखेडच्या दुय्यम निबंधक (रजिस्ट्री ऑफीस) कार्यालयात मुद्रांक शुल्क घोटाळा झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर घोटाळ्याची व्याप्ती अन्य तालुक्यापर्यंत पोहचली असल्याचे उघड झाले असले, तरिही मुद्रांक शुल्क बुडवून दस्तनोंदणी करण्याची ही शक्कल कॉम्प्युटर ऑपरेटरने लढवली, असा प्राथमिक चौकशी अहवाल समोर आल्याने संबंधितावर फसवणुकीचे गुन्हे नोंदवण्यात आले.
हेही वाचा... 'सरकारची निर्णय क्षमता संपली, सरकारच्या निर्णयाचा धिक्कार'
एकट्या मुदखेडच्या रजिस्ट्री ऑफीसमध्ये दीड कोटी रूपयांचा ऑनलाईन घोटाळा झाला होता. याप्रकरणाने आता वेगळीच कलाटणी घेतली आहे. दस्तनोंदणी करताना मुद्रांक शुल्क बुडवून शासनाचे नुकसान करणारे आरोपी पोलीस दफ्तरी नोंद असले तरी त्याची भरपाई, त्या काळात दस्तनोंदणी करणाऱ्या जमिनमालकाकडून करून घेण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
नोंदणी महानिरिक्षक तथा मुद्रांक नियंत्रक यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे मुद्रांक शुल्क वसुलीची प्रक्रिया सुरू झाली आहे. सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांनी तेव्हा केलेल्या दस्तनोंदणीचे मुद्रांक भरावे, अशा नोटीसा जमिनधारकांना पाठवल्या आहेत. त्यामुळे जमीन मालकांमध्ये खळबळ उडाली आहे. तेव्हा दस्तनोंदणी करताना आमच्याकडून नियमानुसार मुद्रांक शुल्क वसुल करण्यात आले आहेत. मग आता दुसऱ्यांदा हे शुल्क आम्ही का भरावे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.
दरम्यान, मुद्रांक शुल्क घोटाळा रजिस्ट्री ऑफीसमध्ये झाला. मुद्रांक शुल्काची पुर्ण रक्कम घेऊन ही रक्कम शासनाच्या तिजोरीत भरली गेली नसेल तर त्याला जमीनमालक जबाबदार असू शकत नाहीत. नुकसानभरपाई जमिनमालकांकडून वसूल करण्याचा हा प्रकार म्हणजे 'चोर सोडून संन्यासाला फाशी' असाच आहे. या संबंधी मुद्रांक जिल्हाधिकारी यांनाही निवेदन देण्यात आले असून आम्ही पैसे भरले आहेत. तसेच यात आमचा दोष नसून खऱ्या दोषींवर कार्यवाही करावी, असे म्हटले आहे.