नांदेड - जिल्ह्यातील हजारो हेक्टर जमिनीवरील खरीप हंगामाची पीकं परतीच्या पावसाने नष्ट झाली आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून प्रति हेक्टरी आठ हजाराची मदत देण्यात येत आहे. ही मदत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून देण्यात येत आहे. याच मदतीच्या रकमेतून शेतकऱ्यांच्या बचत खात्यासाठी एक हजार रुपये सक्तीने कापून घेतले जात आहेत. या सक्तीच्या कपातीमुळे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त केला जात आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने हेक्टरी आठ हजारांची मदत जाहीर केली आहे. ज्या शेतकऱ्यांचे बँकेत खाते नाही, अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर एक हजार रुपये जमा ठेवण्यासाठी कापून घेतले जात आहेत. बँकेच्या या निर्णयामुळे शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा - उन्नाव: भररस्त्यात जाळलेल्या 'त्या' बलात्कार पीडितेचा अखेर मृत्यू...!
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील बचत खात्यात किमान एक हजार रुपये शिल्लक ठेवण्याचा निर्णय २०१७ ला संचालक मंडळाने घेतला. या निर्णयानुसार सध्या शेतकऱ्यांना शासनाकडून मिळालेल्या रकमेतून शेतकऱ्यांच्या बचत खात्यात किमान एक हजार रुपये सक्तीने जमा ठेवण्यात येत आहेत. जेव्हा बँक खाते बंद करण्यात येईल तेव्हा ही रक्कम शेतकऱ्यांना परत मिळणार आहेत. असा निर्णय बँक संचालकांनी घेतला आहे. बँकेने या ठरावाची माहिती वरिष्ठ कार्यालयाला आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहे, अशी माहिती बँकेचे मुख्य अधिकारी संजय कदम यांनी दिली.
शेतकरी अडचणीत असल्यामुळे शासनाने आम्हाला अर्थिक आधार म्हणून मदत जाहीर केली आहे. आमचे इतर बँकेत खाते आहे. त्यामुळे दोन्ही बँकेत आम्हाला किमान रक्कम खात्यावर ठेवावी लागत आहे. शासनाकडून देण्यात येणाऱया मदतीतून एक हजाराची रक्कम सक्तीने कपात करणे अतिशय चुकीचे आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणने आहे.
शेतकऱ्यांच्या बँकेतील बचत खात्यासाठी एक हजार जमा ठेवण्यासाठी कपात करण्यात येत आहेत. ज्या शेतकऱयांच्या खात्यावर एक हजार रुपये जमा आहेत, अशा शेतकऱयांचे पैसे कापले जात नाहीत, अशी प्रतिक्रिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक केशवराव पाटील यांनी दिली.