नांदेड - ग्रामीण भागातील तरुणीची सैन्य दलातील आसाम रायफलमध्ये निवड झाली आहे. नायगांव तालुक्यातील बरबडा येथील पूजा गंगाधर भुसलवाड या तरुणीने हे यश मिळवले आहे. पूजाने मिळवलेल्या यशाचे नांदेडकरांकडून कौतुक केले जात आहे.
देशातील सर्वात जुने निमलष्करी दल म्हणजे आसाम रायफल. आतापर्यंत पुरुषांचीच या आसाम रायफलमध्ये निवड होत होती. परंतु, याला छेद देत केंद्राच्या गृह आणि संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत येत असलेल्या या आसाम रायफलमध्ये नायगाव तालुक्यातल्या बरबडा येथील एका सामान्य कुटुंबातील कन्या असलेली पूजा गंगाधर भुसलवाड हीची नुकतीच निवड झाली असून या निवडीमुळे अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे.
हेही वाचा - करप्रणालीत सवलत नको, पण सुटसुटीतपणा हवा; जळगावातील व्यापाऱ्यांची अपेक्षा
ग्रामीण भागात केलं शिक्षण पूर्ण
पूजाचे शालेय शिक्षण गावातील जिल्हा परिषद व त्यानंतर जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पूर्ण झाले आहे. २०१६ साली बारावी झाल्यानंतर तिने २०१९ मध्ये बीए पूर्ण केले. त्यानंतर सैन्य दलात भरती होऊन भारतमातेची सेवा करण्याचे ध्येय मनाशी बाळगून तिने नांदेड याठिकाणी लेखी आणि शारीरिक चाचणीची कठोर मेहनत घेतली.
प्रतिकूल परिस्तितीवर केली मात
पूजा हिने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत हे यश संपादन केले आहे. एकही गुंठा नावावर नसलेले तिचे वडील गंगाधर भुसलवाड हे भूमिहीन आहेत. स्वबळावर अतिशय मेहनतीने त्यांनी मोठ्या मुलाला अभियंता व एकुलत्या एका कन्येला देशसेवेसाठी प्रोत्साहित केलं व कन्येनहीं सैन्यदलात भरती होऊन वडिलाच्या स्वप्नांची पूर्ती केली. खरंतर सैन्यदलात महिला सहभागी होण्याचं फारच अल्प प्रमाण आहे.ग्रामीण भागामध्ये तर मुलींचे आई-वडील स्पष्ट नकार देतात. परंतु बसलवाड कुटुंबियांनी मोठ धाडस करत आपल्या कन्येला सैन्यदलात भरती होण्यासाठी पाठबळ दिलं.
नांदेडकरांनी केले कौतुक
दरम्यान भारतीय सैन्य दलात २०१८ या वर्षात महिलेसाठी जागा निघाल्याचे कळताच तिने स्वतःसाठी अर्ज भरला. त्यानंतर नांदेड येथे झालेल्या लेखी परीक्षेत यश संपादन करत पुणे येथे जाऊन शारीरिक चाचणी दिली. यामध्ये देखील यश मिळवल्यानंतर वैद्यकीय चाचणी व कागदपत्र तपासणीसाठी नागपूरला गाठत यातही यशस्वी झाली. चांगल्या पद्धतीने यश मिळवत तिची "आसाम रायफल" मध्ये निवड करण्यात आली. निवड झाल्याचं कळताचं तिला व तिच्या कुटुंबियांना गगनात मावेनासा आनंद झाला. काही वेळात संपूर्ण गावात व परिसरात तिच्या निवडीची बातमी पसरताच तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होऊ लागला अनेकांनी तिच्या परिश्रमाचे कौतुक करत तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा - जालन्यात १३ क्विंटल गौण खनिज जप्त