नांदेड - बनावट कागदपत्रांच्या आधारे पत्नीशी फारकत घेवून दुसऱ्या लग्नाच्या तयारीत असणाऱ्या पतीवर फसवणूक आणि विवाहितेचा छळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पिडीतेच्या तक्रारीनुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पतीसह पाच जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सतिष शंकरराव जाधव असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. नांदेड शहरामध्ये 26 मे 2016 रोजी सतिषचे पिडीतेसोबत लग्न झाले होते. मात्र काही दिवसांतच सासरच्या मंडळीकडून पिडितेला त्रास होऊ लागला. त्यामुळे मध्यस्थांच्या मध्यस्तीतून सासरच्या मंडळीची समजूत काढण्यात आली. त्यानंतर काही दिवस सासरच्या मंडळींनी पिडितेला चांगली वागणूक दिली. मात्र गेल्या दोन वर्षापासून किरकोळ कारणावरुन ते विवाहितेला सतत त्रास देत होते. सासरच्या मंडळींची समजूत काढूनही पिडीतेचा त्रास कमी होत नव्हता. त्यामुळे पिडीतेच्या कुटुंबीयांकडून महिला तक्रार निवारण समितीकडे तक्रार दाखल करण्यात आली. या ठिकाणी पुन्हा सासरच्या मंडळींची समजूत घालण्यात आली आणि चांगले वागविण्याच्या अटीवर पिडीतेला पुन्हा घरी आणण्यात आले.
दरम्यान, पतीने बनावट कागदपत्रांच्या आधारे पिडितेशी फारकत घेतल्याचे उघड झाले. इतकेच नाही तर, विवाहित पती दुसऱ्यांदा बोहल्यावर चढण्याची तयारी करत असल्याची माहिती पिडितेच्या कुटुंबीयांना कळाली. त्यामुळे आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच पिडीतेने शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठले. तक्रारीनुसार पती सतिष शंकरराव जाधव, सासरा - शंकरराव जाधव, सासू - पार्वती जाधव, सरस्वती जाधव, सुमन राठोड व पांडूरंग राठोड यांच्या विरोधात फसवणूक व विवाहितेच्या छळाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.