नांदेड - निवघा (ता.मुदखेड) येथील देविदास पवार याचा खून पैशांच्या देवाण-घेवाणीतून झाला. मुदखेड शहरातील लक्की मोरे सह अन्य दोन जणांनी खून केल्याची तक्रार मृताच्या भावाने दिली असून याप्रकरणी लक्की मोरे सह अन्य दोन अज्ञात आरोपींविरोधात बारड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्की मोरे हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. यातील सर्व आरोपी फरार असून आरोपींचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
'दोघांचा आर्थिक व्यवहार होता'
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, देविदास हा गावातील लोकांना व्याजाने पैसे देण्याचा व्यवहार करत होता. मुदखेड येथील लक्की मोरे याच्याशी त्याची ओळख होती. लक्की मोरे हा देखील पैशाची देवाण-घेवाण करायचा तो नेहमी आमच्या गावी येत जात होता. त्यांचा अर्थिक व्यवहार असावा, लक्की हा अपराधी प्रवृत्तीचा आहे.
गावात येऊन गोळीबार!
सोमवारी दि. १७ मे रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास देविदास हा निवघा गावातील चौकात त्यांच्या मित्रांसोबत सोबत बोलत बसला होता. त्यावेळी मुदखेडकडून नंबर नसलेल्या मोटार सायकलवर तिन व्यक्ती देविदास जवळ आले. त्यापैकी एक गाडीवर बसून होता व दोन मोटार सायकलच्या खाली उतरुन देविदास जवळ आले व त्यास मोटार सायकलवर बस म्हणून ओढत होते. मी तुमच्या सोबत मोटार सायकलवर बसणार नाही असे म्हणताच त्यातील मुदखेडचा राहणारा लक्की मोरे याने त्याच्या जवळची पिस्तुल काढून देविदास यांच्या कपाळावर लावली. त्यांच्या सोबतच्या व्यक्तीने रुमालात लपवलेली तलवार बाहेर काढली. त्या वेळेस लक्की मोरे याने त्याच्या हातातील पिस्तुलची गोळी देविदास याच्या उजव्या पायाच्या कमरेजवळ मारली. त्यावेळी मोठा आवाज आल्याने ऑटो पॉईंटवरील लोक तिकडे धावून जात असताना लक्की मोरे यांनी त्याच्या हातातील पिस्तुलने हवेत गोळीबार करून ज्याला मरायचे असेल त्यांनी पुढे या असे म्हटल्याने गावातील लोक त्यांच्या हातातील पिस्तुल व तलवारीला घाबरून तेथेच थांबले. नंतर त्यांनी देविदास यास जखमी व रक्तबंबाळ अवस्थेत मोटार सायकलवर बसवुन मुदखेड रोडच्या दिशेने निघुन गेले.
लक्की मोरेसह अन्य दोन आरोपी विरोधात गुन्हा दाखल
घटनेची माहिती पोलिसांना मोबाईलवर कळविली असता पोलीसांनी भाऊ देविदास याचा शोध घेतला असता बाडी मुखत्यारपुर शिवारातील एका शेतातील धुऱ्यावर देविदास मृत अवस्थेत आढळला. याप्रकरणी मृताचा भाऊ कामाजी पवार यांनी दिलेल्या फिर्यादी वरून लक्की मोरे व ईतर दोन अनोळखी जणांविरोधात बारड (ता.मुदखेड) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवराज तुगावे हे करत आहेत.
'तो खून दोघांच्या व्यक्तिगत देवाण-घेवाणीतून'
मुदखेड तालुक्यातील निवघा येथे देवीदास पवार (वय-३५) यांच्यावर गावच्या चौकात तलवारीने हल्ला करण्यात आला, त्यानंतर त्याचे अपहरण करुन निवाघा गावपासून दहा कि.मी. अंतरावर एका शेतात नेऊन खून केला व मृतदेह फेकून दिला. हा परस्पर शत्रुत्व व आर्थिक व्यवहाराची यातून झाला आहे. बराच काळ मृत व्यक्ती आणि आरोपी यांच्यात भांडण होते. अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी दिली आहे.
हेही वाचा - सिंधुदुर्गात दोन बोटी बुडाल्या.. एका खलाशाचा मृत्यू तर तीन खलाशी बेपत्ता