नांदेड - तीर्थक्षेत्र माहूर शहरातील गणेश मंदिर टेकडीजवळच्या परिसरातील एका १३ वर्षीय मुलीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सोमवारी (२८ ऑक्टोबर) सांयकाळच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. बहिणीसोबत गावाला जाऊ दिले नाही, या वादातून मुलीने आत्महत्या केल्याची तक्रार मृत मुलीच्या आईने दिली आहे.
शहरातील श्री रेणुकादेवी मंदिराकडे जाणाऱ्या घाटात गणेश मंदीर टेकडीजवळ अनेक कुटुंब झोपड्या बांधून राहतात. येथेच ललिताबाई माधव धबडगावकर (वय ४०) या आपल्या १३ वर्षीय मुलगी पूनमसोबत राहत होत्या. सोमवारी ललिताबाई कामानिमित्त माहूर शहरात गेल्या होत्या. घरात पूनम एकटीच होती. दुपारी ३च्या सुमारास ललिताबाई आपले कामकाज आटोपून घरी आल्या. घराचे दार आतून बंद असल्यामुळे त्यांनी पूनमला आवाज दिला, मात्र तिने दार उघडले नाही. तेव्हा त्यांनी धक्का देत दार उघडले. आत गेल्यानंतर त्यांना नाटीला ओढणी बांधून गळफास घेतलेल्या अवस्थेत पूनम दिसून आली.
त्यांनी आरडाओरड करत पूनमच्या गळ्यातील गळफास काढुन तिला पलंगावर झोपवले. तितक्यात आजूबाजूच्या महिला घरात आल्या त्यांनी पूनम मृत असल्याचे सांगितल्याने. त्यानंतर सायंकाळपर्यंत ललिताबाई रडत घरात बसून होत्या. शेजाऱ्यांनी दूरध्वनीवरून पोलिसांना कळविल्यानंतर पोलीस निरीक्षक लक्ष्मण राख, आणि सहायक पोलीस उपनिरिक्षक शरद घोडके यांनी घटनास्थळी धाव घेत पूनमला ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉ. वाघमारे यांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले.
दिवाळीनिमित्त ललिताबाईंनी पूनमला पुसदवरून आणले होते. त्यानंतर लग्न झालेली मोठी मुलगी डिंपल ही पूनमला घेण्यासाठी आली होती. परंतु, डिंपल सोबत पूनमला न पाठविल्याने, त्याचा राग मनात धरून पूनमने घरी कोणी नसल्याचे पाहून आत्महत्या केल्याची तक्रार पूनमच्या आई ललिताबाईंनी माहूरच्या पोलीस ठाण्यात दिली आहे. घटनेची नोंद घेत पोलीस निरीक्षक लक्ष्मण राख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक शरद घोडके, सहायक पोलीस उपनिरिक्षक जे. जे. मेश्राम, पोलीस काँस्टेबल रवी कोडमवार, होमगार्ड सुरेश सिरसाट आणि इंदू वेट्टी हे पुढील तपास करीत आहेत.
हेही वाचा : नांदेडमध्ये डोळ्यात मिर्चीपूड टाकून सेल्समनला लुटले, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल