नांदेड - मुलगा होत नसल्याच्या कारणावरून पत्नीला जिवंत जाळून तिची हत्या करणाऱ्या आरोपीला जन्मठेप आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. प्रमुख जिल्हा न्यायाधीश दीपक ढोलकिया यांच्या न्यायालयामध्ये ही सुनावणी घेण्यात आली.
आरोपी सत्यव्रत गारोळे किनवट तालुक्यातील बेल्लोरी धानोरा येथील रहिवासी आहे. त्याचा काही वर्षांपूर्वी सत्यभामासोबत विवाह झाला होता. त्यानंतर काही काळ सुखी संसार झाला. त्यांना ४ मुली देखील झाल्या. मात्र, मुलगा का होत नाही यावरून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू झाला. याच कारणावरून दोघांमध्येही वाद झाला. गेल्या ९ डिसेंबर २०१६ ला सायंकाळी ६ वाजता सत्यव्रत घरी आला. त्यानंर दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्याने पत्नी सत्यभामाला रॉकेल टाकून जिवंत जाळले. त्यामध्ये ती ९४ टक्के भाजली होती. रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मात्र, त्यापूर्वी तिने तिच्यासोबत घडलेला प्रसंग जबाबात नोंदवला होता. त्यानुसार श्रावण हुरदुके यांनी दिलेल्या तक्रारीवरून किनवट पोलिसांनी सत्यव्रत गारोळे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.
किनवटचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अरुण जगताप यांनी या प्रकरणाचा तपास करून जिल्हा न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. न्यायालयाने एकूण १२ जणांच्या साक्षी नोंदवल्या. बहुतांश साक्षीदार फितूर झाले होते हे विशेष. त्यानंतर दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद करण्यात आला. मृत्यूपूर्व जबाब, सरकारी पक्षाने केलेला युक्तिवाद व उपलब्ध पुराव्यांच्या आधारे प्रमुख जिल्हा न्यायाधीश दीपक ढोलकिया यांनी सत्यव्रत गारोळे याला जन्मठेपेची शिक्षा व ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. याप्रकरणी सरकारी पक्षाची बाजू अॅड. एम. ए. बतुल्ला डांगे यांनी मांडली. त्यांना पैरवी अधिकारी म्हणून एएसआय शेख सलीम शेख लाल व पोलीस हेड काँस्टेबल बी. व्ही.महाजन यांनी मदत केली.