नांदेड - येत्या १० नोव्हेंबरपासून नांदेड-अमृतसर विमानसेवा पुन्हा सुरू होणार आहे. ही सेवा आठवड्यातून तीन दिवस सुरू राहणार आहे. यासाठी एअर इंडियाने तिकिटांची बुकींग सुरू केली आहे.
शहरातील जगप्रसिद्ध हजूरसाहीब सचखंड गुरुद्वाऱ्यात दर्शनासाठी देश विदेशातून हजारो भाविक येत असतात. परंतु, कोरोना आजाराचा संसर्ग होऊ नये म्हणून केंद्र सरकारने देशभरातील धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे, मार्च महिन्यांपासून नांदेड - अमृतसर विमानसेवा बंद होती. आता टप्याटप्याने देशांतर्गत विमानसेवेला प्रारंभ होत असून, एअर इंडियाने येत्या १० नोव्हेंबरपासून नांदेड -अमृतसर विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
आठवड्यातून तीन दिवस विमानसेवा
मंगळवार, गुरुवार व शनिवार, असे तीन दिवस ही विमानसेवा सुरू राहणार आहे. अमृतसरहून सकाळी ११.३० वाजता एअर इंडियाचे विमान नांदेडकडे उड्डाण भरेल. दुपारी २ वाजून ५ मिनिटांनी हे विमान नांदेड विमानतळावर उतरेल. ज्या दिवशी विमान नांदेडला पोहोचेल त्याच दिवशी दुपारी ३ वाजता हे विमान अमृतसरकडे परत उड्डाण भरेल व सायंकाळी ५.३० वाजता अमृतसरला पोहोचेल. दीपावली सण व गुरूतागद्दीचा सोहोळा लवकरच आहे. अशा वेळी विमानसेवा पुन्हा सुरू होत आहे ही सर्वांसाठी आनंदाची बातमी ठरली आहे.
हेही वाचा- अर्धापुरात चोरट्यांनी ६ दुकाने फोडली, पावणे दोन लाखाचा ऐवज लंपास