नांदेड - नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बी.आर.कदम यांनी ७ मे ला राजीनामा दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राजीनामा देण्याच्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. बाजार समितीची प्रगती व आर्थिक शिस्त यासाठी प्रयत्न बी. आर. कदम हे प्रयत्नशील होते.
तीन वर्षांपूर्वी काँग्रेसला १३ तर भाजपला ५ जागा मिळाल्या होत्या. सभापतीपदी बी. आर. कदम यांची निवड करताना खासदार अशोक चव्हाण यांनी नियुक्ती अडीच ते तीन वर्षांसाठी राहील, असे सांगितले होते. अडीच वर्षाचा कालावधी उलटल्यानंतर कदम यांच्या विरोधातील एक गट सातत्याने सभापतीपदावरून त्यांना दूर करण्यासाठी आग्रही होता. त्यामुळे लोकसभा निवणूक होताच त्यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाली होती.
अखेर ७ मे रोजी सभापतीपदाचा राजीनामा त्यांनी थेट जिल्हा उपनिबंधकांकडे सादर केला आहे. कदम यांनी राजीनामा दिल्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. राजीनामा दिल्यानंतर त्यांची राजकीय भूमिका काय राहील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.