नांदेड -हैदराबाद ते मनमाड लोहमार्गावरील मुदखेड ते परभणी लोहमार्गाचे दुहेरीकरणाच्या कामाला वेग आला असून आसना नदीवरील पुलाचे काम अंतिम टप्यात आले आहे.
प्रवाशांची गैरसोय दुर करण्यासाठी रेल्वे विभागाने मुदखेड ते परभणी या लोहमार्गावरील दुहेरीकरणाचे काम हाती घेतले होते. या कामासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून काम अंतिम टप्प्यात आले आहे. सध्या मुगट ते मुदखेड दुहेरी लाईन सुरू झाली आहे. या नवीन मार्गावर रेल्वेही धावत आहेत. या मार्गावर असलेल्या काही पूलांचे बांधकाम पूर्ण झाले असून काही पूलांचे काम प्रगतीपथावर आहे. मात्र, सर्वात मोठा पूल म्हणून ओळख असलेल्या आसना पूलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
दरम्यान, काही तांत्रिक अडचणीमुळे निझामाबाद ते नांदेड रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. अनेक रेल्वे क्रॉसिंगसाठी तासनसास एकाच रेल्वे स्टेशनवर थांबून राहतात. मात्र, नवीन दुहेरी लाईन पूर्ण झाली तर ही समस्या तात्काळ सुटणार आहे. त्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे अशी अपेक्षा रेल्वे प्रवाशी व्यक्त करीत आहेत.