नांदेड - मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात सापांचा वावर तसा खूप मोठा आहे. जून-जुलै महिन्यात वातावरणातील बदलामुळे आणि या महिन्यात पावसाळ्याला सुरूवात होत असल्यामुळे, साप मोठ्या प्रमाणावर बाहेर पडतात. या काळात ते सुरक्षित जागेचा शोध घेत असतात. त्यामुळे या काळात मनुष्यवस्तीजवळ सापांचा वावर अधिक दिसून येतो.
जून-जुलै महिन्यात उकाडा होणे, आदी कारणांमुळे सर्वच सरपटणारे प्राणी बाहेर पडतात. सरपटणाऱ्या प्राण्यांना वातावरणात होत असलेले बदल खूप लवकर समजतात. त्यातही हे वातावरणीय बदल सापांना लवकर कळतात. त्यामुळे या काळात सर्वत्र साप दिसण्याच्या घटना समोर येतात.
हेही वाचा - टाळेबंदीत ग्राहकांकडून 5.5 लाख चिकन बिर्याणीच्या ऑनलाईन ऑर्डर!
नांदेडमध्ये चार प्रकारच्या विषारी सापांचा वावर...
नांदेड जिल्ह्यात प्रमुख चार विषारी सापांचा वावर आढळतो. त्यामध्ये नाग, मण्यार, फुरसे आणि घोणस या सापांचा समावेश आहे. या सपांपैकी काही साप चावल्यानंतर रक्तातील हिमोग्लोबिनवर परिणाम होतो. तर, काही मज्जा संस्थेवर परिणाम करतात. त्यातही नांदेड जिल्ह्यात निम्न विषारी सापांचा देखील वावर आढळून आलेला आहे. त्यामध्ये मांजऱ्या आणि हारण टोळ या सापांचा समावेश होतो.
विषारी साप चावल्यानंतर एक ते दीड तासानंतर लक्षणे दिसून येतात. त्यामध्ये रुग्णाला ज्याजागी दंश झालेला आहे. त्याठिकाणी एक किवा दोन विषारी दंत आढळतात. दंश झालेली जागा निळी झालेली दिसते, त्याठिकाणी सूज आढळून येते, डोळे विस्पर्तत, लघवीमध्ये रक्ताचे प्रमाण आढळून येते, रक्त पातळ होते, रुग्णाला तीव्र वेदना होतात. विषारी साप चावल्यानंतर त्वरित प्राथमिक उपचार करून एक ते दीड तासात सरकारी दवाखान्यात किवा खासगी दवाखान्यात जाणे क्रम प्राप्त आहे.या काळात उशीर झाल्यास रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो.
निम्न विषारी साप चावल्यास भोळ येणे, बेशुद्ध पडणे इत्यादी लक्षणे आढळतात परंतु रुग्णाचा मृत्यू होत नाही. बिन विषारी सपांची संख्या नांदेड जिल्ह्यात खूप मोठी आहे. यामध्ये प्रामुख्याने धामण, दिवड, कवड्या नाग, तस्कर, पहाडी तस्कर, अजगर, नानेटी, गवत्या साप, इत्यादी सापांचा वापर आढळून येतो. साप घरामध्ये येऊ नये यासाठी घराच्या आवारात छतावर आलेल्या झाडांच्या फांद्या तोडाव्यात. घराच्या मुख्य गेट जवळ चार फूट लांब जागा गुळगुळीत करावी, जुळगुळीत जागेवरून साप आत येऊ शकत नाही. कंपाऊड किवा घरात उंदीर, पाली, सरडे, बेडुक होणार नाही. याची काळजी घ्यावी, कारण सापांचे हे प्रमुख अन्न आहे. ते अन्नाच्या शोधत घरात प्रवेश करू शकतात, असे बऱ्याच ठिकाणी आढळून आलेले असल्याची माहिती सर्पमित्र विनोद कुटे-पाटील यांनी दिली.
सर्पदंशावर देखील राष्ट्रीय कार्यक्रम व्हावा - डॉ. पुंडे
दरवर्षी सर्पदंशाने हजारो लोक दगावतात. या मृत्यूंमध्ये शेतकरी आणि मजुरांचा मोठा सहभाग आहे. ग्रामीण भागात याचा परिणाम जास्त दिसून येतो. सर्पदंशावर राष्ट्रीय कार्यक्रम घोषित करून ग्रामीण भागात जनजागृती व्हावी. तसेच सर्पदंश विषयाचा शैक्षणिक अभ्यासक्रमात समावेश होणे आवश्यक आहे. मलेरिया, क्षयरोग यांसारख्या रोगांप्रमाणे सर्पदंशावर देखील राष्ट्रीय कार्यक्रम घ्यावा अशी अपेक्षा डॉ. पुंडे यांनी व्यक्त केली आहे.