नांदेड - 'व्हॅलेंटाईन डे'निमित्त शहरातील कॉफी शॉपवर पोलिसांची नजर असणार आहे. त्याच बरोबर महाविद्यालय परिसरात व उद्यानात पोलिसांची गस्त वाढणार आहे. शहरात मोठ्या प्रमाणात कॉफी शॉप उघडण्यात आले आहे. यामध्ये महाविद्यालयीन तरुण-तरुणींच्या अश्लील प्रकारास प्रोत्साहन देण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार गत काही दिवसांपूर्वी समोर आला होता. त्यामुळे या कॉफी शॉपची पोलिसांकडून तपासणी करण्यात येणार आहे.
तपासणीवेळी आक्षेपार्ह प्रकार आढळल्यास त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती नांदेड शहर पोलीस उपाधिक्षक अभिजित फसके यांनी दिली. काही दिवसांआधी शहरातील पावडेवाडी, कौठा, आनंदनगर परिसरात कॉफी शॉपवर धाडी टाकण्यात आल्या होत्या. त्यावेळी या ठिकाणावरुन अश्लिल चाळे करणाऱ्या जोडप्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तसेच अशा कॉफी शॉपच्या विरोधात कारवाई करण्यात आली होती. शहराजवळील वाडी ग्रामपंचायतीने अशा कॉफी शॉप चालकांचे परवाने रद्द केले होते. या कारवाईनंतर शहरातल्या अनेक कॉफी शॉपमध्ये असे प्रकार घडत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
व्हॅलेंटाईन डे निमित्त अशा कॉफी शॉप चालकाने जय्यत तयारी केली आहे. त्यासाठी अनेक कॉफी शॉप चालकांनी तरुण-तरुणींना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर दिले आहेत. महाविद्यालयीन तरुण-तरुणी व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने फसवणूक करणाऱ्यांचा जाळ्यात ओढले जाऊ नये यासाठी पोलिसांची गस्त सुरू राहणार आहे. तसेच अशा कॉफी शॉपवर पोलिसांची कटाक्ष नजर राहणार आहे. शिवाय महाविद्यालय, खासगी कोचिंग क्लासेस, उद्याने या परिसरात पोलिसांची गस्त राहणार आहे. त्याचबरोबर या परिसरात बुलेट दुचाकीवरून हुल्लडबाजी करणाऱ्यांनाही जरब बसावी म्हणून, दामिनी पथकासोबत पोलीस कर्मचाऱ्यांची गस्त वाढवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.