नांदेड - ईद हा मुस्लीम बांधवांचा आनंदाचा सण असतो. नवीन कपडे परिधान करणे. नातेवाईकांशी भेटी-गाठी घेणे. मित्र मंडळींना बोलावून या दिवशी शिरखुर्मा खाऊ घालणे. तसेच अनेक गोड पदार्थ खाऊन हा सण साजरा केला जातो. पण नांदेड शहरातील हॅप्पी क्लबच्या मुस्लीम तरुणांनी या दिवशी एक वेगळा उपक्रम हाती घेतला. त्यांनी पीपीई किट घालून कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले. यातून त्यांनी एक आगळा वेगळा आदर्श घालून दिला.
नांदेडच्या हॅप्पी क्लबचा पुढाकार
कोरोना काळात रक्ताचे नातेवाईक ओळख दाखवत नाही, जवळ येत नाहीत, अशी अनेक उदाहरणे आहेत. त्यात कोरोनाने मृत्यू झालेल्या कुटुंबातील सदस्य अंत्यसंस्कार करताना धजवत नाहीत. मात्र, नांदेड येथील हॅप्पी क्लब अनेक महिन्यापासून कोरोनाने मृत्यूमुखी पडलेल्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करत आहेत. शुक्रवारी ईद साजरी करण्यात आली. यावेळी या कोरोना योद्ध्यांनी ख्रिश्चन समाजातील कोरोनाने मृत्यू पावलेल्या एका व्यक्तीवर त्यांच्या धर्मातील पद्धतीनुसार अंत्यसंस्कार केले. हॅप्पी क्लबचे सदस्य सर्व धर्मातील मृतांवर त्यांच्या रितीरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार करतात.
आतापर्यंत 950 कोरोना मृतदेहावर अंत्यसंस्कार
हॅप्पी क्लबमधील तरुणांनी सर्वधर्मीय कोरोना मृतांचे अंत्यसंस्कार केले आहेत. आतापर्यंत 950 कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार त्यांनी केले आहेत.
उपवास असतानाही रमजानमध्ये अंत्यसंस्कार
मुस्लीम धर्मियांच्या रमजान महिन्यातसुद्धा हॅप्पी क्लबच्या सदस्यांनी त्यांचे हे पवित्र कार्य थांबवले नव्हते. मुस्लीम धर्मियात रमजानचा महिना पवित्र मानला जातो. या काळात त्यांचा दिवसभर उपवास असतो. मात्र उपवास असूनही या हॅप्पी क्लबच्या सदस्यांनी कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार केले आहेत.
हेही वाचा - 'तौक्ते' चक्रीवादळ काही तासात कोकण किनारपट्टीला धडकणार, मुसळधार पावसाचा इशारा