नांदेड - कौटुंबीक वादातून नशेच्या भरात पतीने सासुरवाडीला जाऊन पत्नी आणि मुलाची गळा चिरून हत्या केल्याची खळबळजनक घटना मुखेड तालुक्यातील मंडलापूर येथे आज सकाळी घडली. या घटनेतील आरोपी पळून जाण्याआधीच ग्रामस्थांनी त्याला पकडून झाडाला बांधून ठेवले. त्यांनतर मुखेड पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
देगलूर तालुक्यातील येडूर येथील तानाजी भुताळे याच्यासोबत मुखेड तालुक्यातील मंडलापूर येथील वैशालीचा विवाह झाला होता. तानाजीला दारूचे व्यसन असल्याने वैशाली कंटाळून आपल्या छोट्या मुलासह माहेरी निघून आली होती. त्यानंतर तानाजीचा राग अनावर झाल्याने तो आज सकाळी येडूर येथून सासुरवाडी मंडलापूर येथे आला होता. गावाकडे चल म्हणून त्याने आपल्या पत्नीकडे तगादा लावला. यावरून त्यांच्यात वाद झाला आणि रागाच्या भरात आरोपी तानाजी भुताळे याने पत्नी वैशाली आणि मुलगा आदेश या दोघांचा गळा चिरून खून केला.
त्यानंतर तो पळून जाताना ग्रामस्थांनी त्याला पकडून झाडाला बांधून ठेवले. संबंधित घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब मगर हे घटनास्थळी दाखल झाले.