नांदेड : दिवसेंदिवस नांदेडमध्ये गुन्हेगारीच्या घटना घडण्याचे प्रमाण वाढत चालले असल्याचे दिसून येत आहे. शहरातील सिडको भागातील वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या जुन्या इमारती समोरील रस्त्यावर ही घटना घडली. राज सरपे आणि त्याचे काही नातेवाईक कामानिमित्त गुरुवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास वरील रस्त्यावर आले. त्याठिकाणी पाच ते सहा आरोपींनी त्यांच्याशी वाद घातला. आरोपींच्या हातात धारदार शस्त्रे होती. दरम्यान, वाद वाढत गेला आणि आरोपींनी धारदार शस्त्राने राज सरपे याच्यावर हल्ला केला.
पूर्ववैमनस्यातून घटना घडल्याचा अंदाज : राज सरपे हा रक्ताच्या थारोळ्यात खाली पडल्यानंतर आरोपी तेथून पसार झाले. घटनेनंतर या भागात जमाव जमा झाला. हल्ल्यादरम्यान गोळीबार झाल्याचीही माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. या परिसरात गोळीबार झाल्याची जोरदार चर्चा आहे. राज सरपे आणि आरोपींमध्ये यापूर्वीही भांडणे झाली होती. राज सरपे याच्या घरासमोरील गाडी जाळल्याची घटना घडली होती. त्यामुळे पूर्ववैमनस्यातून ही घटना घडल्याची चर्चा आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांत भीती पसरली आहे.
गोळीबारात युवकाचा खून : घटनेनंतर उपविभागीय पोलिस अधिकारी सिद्धेश्वर भोरे, ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड, स्थानिक गुन्हा शाखेचे उपनिरीक्षक सचिन सोनवणे, आदींनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी उशिरापर्यंत ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला नव्हता. पोलिसांचा दुजोरा नाही सिडको भागात गोळीबारात युवकाचा खून झाल्याची जोरदार चर्चा आहे. काही प्रत्यक्षदर्शीनींदेखील गोळीबार झाल्याचा आवाज आला, असे सांगितले. पोलिसांनी मात्र अद्याप याबाबत दुजोरा दिला नाही.
पथके रवाना, सीटीस्कॅन करुन गोळी शोधणार : घटनेनंतर स्थानिक गुन्हा शाखेचे एक आणि ग्रामीण पोलिस ठाण्याचे एक अशी दोन पथके आरोपींच्या शोधार्थ रवाना झाली आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी मयताच्या शरीरावर चार ठिकाणी जखमा दिसून आल्या. त्यातून रक्तस्त्राव होत होता. परंतु प्रथमदर्शनी गोळी लागल्याची जखम मात्र दिसून येत नव्हती. घटनास्थळी फॉरेन्सीक पथक बोलावण्यात आले. तसेच पंचनामाही करण्यात आला. सोमवारी सकाळी मृतदेहाचे सीटीस्कॅन करून शरीरातील गोळी शोधण्याचे काम केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. पुढील तपास सुरू आहे.