नांदेड - मुदखेड नगरपालिकेचे अपक्ष नगराध्यक्ष मुजीब जहागिरदार यांना ३ लाख १२ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. देयकावर सही करण्यासाठी ही रक्कम मागितल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून संबंधित कारवाई करण्यात आली आहे.
मुदखेड नगर परिषदेच्या विविध विकास कामांचे शिल्लक देयक तसेच सुरक्षा ठेवीच्या एकूण ३४ लाख ८४ हजार ५२६ रक्कमेच्या व्हाऊचरवर स्वाक्षरी करून देण्यासाठी मुजीब जहागीरदार यांनी ५ लाख रूपयांची लाच मागितली होती. यानंतर दि. ०१ ऑगस्ट रोजी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय, नांदेड येथे तक्रार नोंदवण्यात आली.
या तक्रारीनुसार नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून दि. ०९ ऑगस्ट रोजी सापळा लावण्यात आला. यावेळी नगराध्यक्षांनी ३ लाख १२ हजार रक्कमेची मागणी करुन, ही रक्कम मोहम्मद आली मोहम्मद एजाझ नामक व्यक्तीकडे सुपूर्त करण्यास सांगितले. संबंधित व्यक्तीने नगराध्यक्ष मुजीब जहागिरदार यांच्या वतीने लाच स्वीकारल्याने दोघांनाही या रक्कमेसह रंगेहात पकडण्यात आले आहे.
याप्रकरणी लोकसेवक मुजीब अहमद अमिरोद्दीन अन्सारी (वय ५१ वर्षे) व मोहम्मद आली मोहम्मद एजाझ (वय २८ वर्षे) यांच्या विरोधात मुदखेड पोलीस स्थानकात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरु आहे.