नांदेड - राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापू लागले आहे. मराठा समाज आक्रमक होत असताना आता, राजसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. मराठा आरक्षणाच्या सुनावणी संदर्भात न्यायालयाच्या मागील तारखेस न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी सरकार कमी पडले. त्यावेळी न्यायालयात राज्य सरकारचा प्रतिनिधी का उपस्थित राहिला नाही? तसेच राज्य सरकारला मदत करण्यासाठी मराठा समाजातील तज्ज्ञ लोकांची नियुक्ती करावी, अशी मराठा समाजाची मागणी आहे. मात्र, सरकारकडून कोणतेचे योग्य पाऊल उचलले जात नाही. त्यामुळे सरकारचे नेमके काय चाललं आहे, हे मराठा समाजालाही कळू द्या? अशी मागणी करत संभाजीराजेंनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. नांदेडमध्ये स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड आयोजित मराठा आरक्षण मेळाव्यात ते बोलत होते.
तज्ञ लोकांची समिती स्थापन करा
यावेळी खा. संभाजीराजे बोलताना म्हणाले की, सर्वोच न्यायालयात बाजू मांडण्यासाठी आता विद्वान व हुशार लोकांची सल्ला घेण्याची गरज आहे. त्यामुळे राज्य सरकारने समिती स्थापन करावी. कुठे कुणाचा विरोध होणार नाही. मी तुम्हाला दहा नावे द्यायला तयार आहे. कोर्टात काय बाजू मांडायची ते बाहेर बोलणार नाही, ती आमची रणनिती आहे, असे ही संभाजीराजे यावेळी म्हणाले.
माझा लढा सर्व बहुजन समाजासाठी
मराठा आरक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज यांनी अठरा पगड जातींना सोबत घेऊन चालले. शाहू महाराजांनी बहुजन समाजामध्ये उल्लेख करताना मराठा समाजाचाही उल्लेख केला होता. पण आज मराठा समाज प्रवाहात नाही. माझा लढा केवळ एका मराठा समाजासाठी नाहीतर संपूर्ण बहुजन समाजाला एका छताखाली आणण्यासाठी आहे, असेही खा. संभाजीराजे म्हणाले.
एमपीएससी उत्तीर्ण उमेदवारांना नियुक्ती का नाही-
मराठा समाजाने एमपीएससीच्या परीक्षा थांबवल्या असा सूर निघाला. पण याच्या पाठीमागचा अभ्यास कुणी करत नाही. २०१९-२० मध्ये ज्या परीक्षा झाल्या. त्यात ४२० मुले परीक्षा पास झालेत. यात मराठा समाजाची केवळ १२७ मुले आहेत. याबाबतीत मी मुख्यमंत्री व संबंधित सचिव यांच्याशी बोललो, पण मला उत्तर मिळाले नाही. तसेच २०१४ ची पदभरती व वीज वितरण भरतीच्या बाबतीतही हीच स्थिती आहे. त्यांना का रुजू केले जात नाही? असा सवालही खा.संभाजीराजे यांनी उपस्थित केला.
नरेंद्र पाटील यांची शरद पवार व अशोक चव्हाण यांच्यावर खालच्या पातळीवरून टीका-
मराठा आरक्षणा संदर्भात सरकारची भूमिका उदासीन आहे, अशी टीका करत अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सरकारवर तोफ डागली. नांदेड येथील मराठा आरक्षण एल्गार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांची जीभ घसरली. त्यांनी खालच्या पातळीवर जाऊन शरद पवार आणि अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली. यावेळी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष माधवराव देवसरकर, छावाचे पंजाबराव काळे, सुभाषराव जावळे, प्रा. गणेश शिंदे, गिरीष जाधव यांच्यासह अनेक मराठा समाजाचे नेते उपस्थित होते.