नांदेड - देशातील शेतकऱ्यांनी उत्पादन केलेल्या मालास उत्पादन खर्चावर आधारित हमी भाव देऊनच सरकारने त्यांच्या मेहनतीचा सन्मान केला पाहिजे. हेच सरकारचे पाऊल शेतकऱ्यांच्या आत्महत्या नक्कीच रोखण्यासाठी मैलाचा दगड होईल, अशी भावना खासदार हेमंत पाटील यांनी विजयवाडा आंध्रप्रदेश येथील संसदेच्या वाणिज्य समितीचा सदस्य म्हणून बैठकीत व्यक्त केली.
सरकारने भक्कमपणे शेतकऱ्यांच्या जीवन मरणाच्या प्रश्नावर ताबडतोब तोडगा काढणे गरजेचे आहे. एखादी कंपनी एखादे उत्पादन तयार करत असेल, तर उत्पादन खर्च लावून नफा गृहीत धरूनच त्याचा भाव जाहीर करते. करोडोमध्ये नफा कमावते. त्याच धर्तीवर शेतात राबणाऱ्या शेतकरी, त्याचा परिवार, गुरे ढोरे व त्यांच्या कष्टाचे गणित आम्ही मांडणार का नाही? असा सवाल उपस्थित केला. त्यांच्या मेहनतीचा व घामाचा सन्मान करायचा असेल, तर उत्पादन खर्चावर आधारीत हमी भाव व नफा हे सूत्र आणि त्याला कायद्याचे पाठबळ द्यावे, ही मागणी संसदीय समितीच्या बैठकीत खासदार पाटील यांनी लावून धरली. आगामी काळातही संसदेत व संधी मिळेल तिथे याच बळीराजाच्या सुखासाठी प्रयत्नात असेल, असेही ते म्हणाले.
वाणिज्य संसदीय समिती विजयवाडा आंध्रप्रदेश व नंतर बेंगलोर-कर्नाटक व कोची-केरळ राज्यात हळद प्रक्रिया उद्योग, सागरी उत्पादने, मिरची प्रक्रिया उद्योग यांसंबंधी शेतीमालाचे आयात निर्यात संदर्भातील धोरण ठरविण्याचे काम ही समिती करत असते. यावेळी अनेक संस्था, समूह व स्थळांना भेटी देऊन अभ्यास व परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न मी करणार आहे, अशी माहिती खासदार हेमंत पाटील यांनी दिली.