नांदेड - परराज्यातून आलेल्या बँक व्यस्थापकांनी हिंगोली लोकसभा मतदार संघातील शेतकऱ्यांशी गैरवर्तन करू नये, त्यांची अडवणूक करू नये. तसेच बँकेला दिलेले पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करावे, अशा सूचना खासदार हेमंत पाटील यांनी हदगाव, हिमायतनगर तालुक्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँकेच्या व्यवस्थापकांना दिल्या.
परतीच्या पावसामुळे हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याबाबत आढावा घेण्यासाठी येथील तहसील कार्यालयात खासदार हेमंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी दोन्ही तालुक्यात राष्ट्रीयकृत बँकांनी केलेल्या कर्ज वाटपाचा आढावा घेतला. संपूर्ण नांदेड जिल्ह्याची कर्ज वाटपाची टक्केवारी अत्यंत कमी असून केवळ 30 टक्के हे खूपच अत्यल्प प्रमाण आहे, असे म्हणत खासदार हेमंत पाटील यांनी बँक अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
यावेळी ते म्हणाले की, नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांमध्ये परराज्यातील व्यवस्थापक नियुक्त आहेत. यांच्याकडून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अपमानास्पद वागणूक आणि गैरवर्तनाच्या व अडवणुकीच्या अनेक तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. त्यामुळे अगोदरच अतिवृष्टीने हवालदिल झालेला शेतकरी बँकाच्या अडवणुकीमुळे पीककर्जासाठी बँकेकडे फिरकत सुद्धा नाही परिणामी पीककर्जाचा टक्का कमी झाला आहे. राज्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात पावसाचे प्रमाण जास्त असूनही पंचनामे आणि कर्जवाटपाचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांना त्वरित पीककर्ज वाटप करण्यात यावे याबाबतही अडवणूक करण्यात येऊ नये, असेही खासदार हेमंत पाटील म्हणाले.