नांदेड - हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील हे सध्या नांदेड जिल्ह्यात अडकलेले पहायला मिळत आहे, आपल्या पत्नीच्या आमदारकीसाठी खासदार महोदयांना आपला मतदारसंघ सोडून इकडेच थांबावं लागत आहे. पाहूयात नांदेड दक्षिण मतदारसंघातील लढतीवर एक विशेष वृत्त...
शिवसेनेचे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील सध्या नांदेडमध्येच व्यस्त आहेत. त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना शिवसेनेने नांदेड दक्षिण मतदार संघातून उमेदवारी दिली. त्यामुळे हेमंत पाटील सध्या पत्नीच्या प्रचारात व्यस्त असल्याचे दिसत आहेत.
हेही वाचा.... नांदेड जिल्ह्यातील विविध मतदारसंघात 'मनधरणी' काउंटडाऊन सुरू
नांदेड दक्षिण या विधानसभा मतदारसंघातुन 2014 साली सेनेचे हेमंत पाटील हे विजयी झाले होते. त्यानंतर नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत हेमंत पाटील हे हिंगोली मतदारसंघातून उभे राहिले आणि विक्रमी मतांनी निवडून देखील आले. त्या नंतर नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी हेमंत पाटील यांनी आपल्या पत्नीला उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यात ते यशस्वी देखील झाले. आता हेमंत पाटील हे नांदेड दक्षिण मतदारसंघात पत्नीसाठी प्रचार करत आहेत.
हेही वाचा... भोकरमध्ये अशोक चव्हाणांविरुद्ध भाजपचे बापूसाहेब गोरठेकर रिंगणात
राजर्षी पाटील ह्या खासदाराच्या पत्नी आहेत इतकीच त्यांची ओळख नाही. त्या एक उत्तम वक्त्या आहेत, बचत गटांच्या माध्यमातून त्यांनी उभारलेले महिलांचे नेटवर्क ही त्यांची जमेची बाजू आहेत. शिवाय गोदावरी अर्बन बँकेच्या माध्यमातून त्यांनी राज्यात सर्वत्र मोठे जाळे निर्माण केले आहे. अशा परिस्थितीतच पक्षाने त्यांना उमेदवारी देत त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे.
हेही वाचा... विधानसभा निवडणूक 2019 : खा.चिखलीकरांना दे धक्का... होमपीचवरची उमेदवारी शिवसेनेच्या वाट्याला..!
नांदेड दक्षिण मतदारसंघात भाजप, काँग्रेसमध्ये मोठी बंडखोरी झाली आहे. त्यामुळे येथून निवडून येणे तितके सोपे नाही. मात्र खासदार हेमंत पाटील हे देखील राजकारणात पक्के मुरलेले असल्याने, ऐनवेळी कोणाशी आणि कशी तडजोड करायची हे त्यांना माहीत आहे, त्यामुळे ते हा मतदारसंघ आपल्याकडे राखतील अशी त्यांच्या समर्थकांना आशा आहे.