नांदेड - पतीसोबत फारकत झाल्यानंतर दुसऱ्यांदा बोहल्यावर चढण्यासाठी अडचण ठरणाऱ्या पोटच्या गोळ्याला निर्दयी मातेने माहेरच्या मंडळींच्या मदतीने विष पाजून हत्या केली. ही घटना हिमायतनगर तालुक्यातील खडकी येथे २६ जुलै २०१९ रोजी घडली होती. या प्रकरणात जवळपास दीड वर्षांनी आईसह पाच जणांविरुद्ध हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिमायतनगर तालुक्यातील बोरगाव येथील अशोक भोजराम तवर यांचा मुलगा संदीप याचा विवाह खडकी येथील कांताबाई सोबत झाला होता. संदीप आणि कांताबाई यांच्यात किरकोळ कारणावरून नेहमी भांडण होत असत. त्यांना २८ मार्च २०१३ रोजी मुलगा झाला. मुलगा झाल्यानंतरही कांताबाई आणि संदीप यांच्यातील भांडणे कमी झाली नाहीत. तेव्हा कांताबाई यांनी संदीपपासून फारकत घेत हिमायतनगर न्यायालयात पोटगीसाठी अर्ज दाखल केला. त्यानंतर कांताबाईंना पोटगी मंजूर झाली.
संदीप तवर यांनी न्यायालयाला मुलगा शिवप्रसाद याचा ताबा मागितला. परंतु मुलगा लहान असल्याने त्याचा ताबा आईकडेच देण्यात आला. मुलगा तीन वर्षांचा झाला असता आईला दुसऱ्यांदा बोहल्यावर चढायचे होते. मात्र, चिमुकला शिवप्रसाद लग्नास अडचण ठरत असल्याने निर्दयी मातेने आपल्या माहेरच्या मंडळीच्या मदतीने गतवर्षी २३ जुलै रोजी पोटच्या गोळ्यास विष पाजले. त्याला उलट्या व जुलाबाचा त्रास सुरू झाला आणि त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
अशोक भोजराज तवर यांनी यासंदर्भात प्रथम पोलीस ठाण्यात फिर्याद दिली, परंतु प्रतिसाद मिळाला नसल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर हिमायतनगर न्यायालयाच्या आदेशानुसार कांताबाईसह इतर पाच जणांविरुद्ध हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.