नांदेड - जिल्ह्यातील कोरोनाचे संकट आणखी वाढले आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत आज 23 रुग्ण संख्येची वाढ झाली आहे. नागरिकांनी काटेकोर दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
बुधवारी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णात नांदेड येथील देगलूर नाका व शिवाजीनगर परिसरातील 21 व्यक्ती, देगलूर तालुक्यातील आमदापूर व मुखेड तालुक्यातील भेंडेगाव येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. या 23 रुग्णांपैकी 20 वर्षाखालील 12 व्यक्ती तर उरलेले 11 व्यक्ती हे 35 वर्षाहून कमी आहेत. जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या 175 वर पोहचली आहे. यापैकी बरे झालेली रुग्ण संख्या 124 आहे.
ही घ्या दक्षता
वाढत्या रुग्ण संख्येला अधिक घाबरून न जाता जनतेने गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नीळकंठ भोसीकर यांनी केले आहे. सतत हात धुणे व मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे प्रत्येकाने आपल्या वर्तनात बदल करुन स्वत: सुरक्षितेची अधिक काळजी घेतली पाहिजे, असे आवाहनही भोसीकर यांनी केले आहे.
रोजच्या जीवनात ज्या वस्तू बाहेरून आणतो , त्याची योग्य स्वच्छता केली पाहिजे. भाजीपाला घेतल्यास तो स्वच्छ करून किमान 12 तास न वापरता स्वच्छ जागी ठेवावा. आपल्या आहाराप्रतीही अधिक सजग राहिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात बुधवार 3 जून रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या 238 अहवालापैकी 193 निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले. नवीन 23 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. . डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथील 1 व पंजाब भवन यात्री निवास येथील 2 रुग्ण असे एकूण 3 रुग्ण आज बरे आहेत. त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
सद्यस्थितीत रुग्णालयात 43 रुग्णांवर डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली औषधोपचार सुरू आहेत. त्यातील 3 रुग्णांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात 52 व 65 वर्षांच्या दोन स्त्री रुग्ण तर 38 वर्षाचा एक पुरुष रुग्ण आहे. आतापर्यंत एकूण 8 रुग्णांचा मृत्यू झाला. तर 124 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
कोरोना विषयी जिल्ह्याची संक्षिप्त माहिती
- सर्व्हेक्षण - 1 लाख 41 हजार 434
घेतलेले स्वॅब - 4 हजार 264
निगेटिव्ह स्वॅब - 3 हजार 739
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या - 23
एकूण पॉझिटिव्ह रुग्ण -175
स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या 164
स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या 51
मृत्यू संख्या - 8
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या - 124
रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण - 43
कोरोनासंदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच मनात कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन नांदेडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.