नांदेड- ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारीला मतदान पार पडणार आहे. लोहा-कंधार मतदार संघातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींनी गावचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी निवडणूक बिनविरोध काढा आणि १० लाख रुपये बक्षीस मिळवा, असे आवाहन आमदार शामसुंदर शिंदे यांनी ग्रामपंचायतींना केले आहे.
करोना काळात प्रशासनावरील ताण कमी होईल-
बिनविरोध निवडणुका झाल्यास कोरोना महामारीच्या संकटात व्यस्त असलेल्या प्रशासनावरचा ताणही कमी होण्यास मदत होईल. गावा गावातील शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवून मतदारसंघातील ग्रामपंचायती बिनविरोध काढून गावचा सर्वांगिण विकास साधण्याचे आवाहन आमदार शिंदे यांनी केले आहे. निवडणूका बिनविरोध निघणाऱ्या ग्रामपंचायतींना येणाऱ्या काळात निधीची कसलीही कमतरता पडू देणार नसल्याचे आश्वासन शिंदे यांनी दिले.
सर्वांगीण विकास आणि एकोपा वाढेल-
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि एकोपा अबाधित ठेवण्यासाठी निवडणुका बिनविरोध घेणं गरजेचं आहे. यामुळे गावातील शांतता देखील कायम राहील आणि गावातील एकोपा वाढेल. यासाठी सर्वांनी गट-तट बाजूला ठेऊन एकत्र यावं आणि गावचा विकास साधून घ्यावा असं आवाहन आमदार शिंदे यांनी केलं.
बिनविरोधसाठी ग्रामपंचायतींचा प्रतिसाद-
मतदारसंघातील अनेक गावातील पदाधिकाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा केलेली होती. त्यास बऱ्याच ग्रामपंचायतीने निवडणुका बिनविरोध काढण्यासाठी प्रतिसाद दिला असल्याचं सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे यांना सांगितलं.