नांदेड - जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र माहूर तालुक्यात बिहार, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यातील मजूर अडकलेले आहेत. त्यांनी बुधवारी माहूर तहसील कार्यालय गाठून आपली व्यथा सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांना सांगितली. तसेच गावी परत जाण्यासाठी परवानगी द्यावी. व्यवस्था नसेल तर आम्ही पायीच जावू, अशी भावनिक साद गोयल यांना घातली.
देशात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत चालला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनमध्ये १७ मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. माहूर तालुक्यातील वाई बाजार येथे जेसीबीच्या माध्यमातून विहीर खोदकाम करण्यासाठी आलेल्या बिहार, झारखंड, राजस्थानमधील मजुरांना लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. हे मजूर आपले घरदार सोडून सोडून चार महिन्यापूर्वी माहूर तालुक्यातील वाई बाजार परिसरात कामाच्या शोधात आले आहेत. लॉकडाऊनमुळे मागील २२ मार्चपासून काम बंद असल्याने मजुरांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे त्यांनी सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांना गावी जाण्यासाठी परवानगी मागितली. सरकार रेल्वे, बस उपलब्ध करून देत नसेल आम्ही पायी जाऊ. मात्र, आम्हाला परवानगी द्या, अशी विनवणी त्यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी गोयल यांना केली. त्यानंतर गोयल यांनी येत्या दोन ते चार दिवसात निर्णय घेवून तुम्हाला तुमच्या गावी जाण्यास परवानगी मिळवून देईल, असे सांगत मजुरांना दिलासा दिला आहे.