नांदेड - नांदेडमध्ये कोरोना योद्ध्यांच्या सन्मान सोहळ्यात मान-अपमान नाट्य रंगल्याने व्यासपीठावर गोंधळ उडाला. शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने शनिवारी (दि. 20) कोरोना योद्ध्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला व्यासपीठावर पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी यांची उपस्थिती होती.
शिवजन्मोत्सव कार्यक्रमात गोंधळ
शिव जयंती निमित्त नांदेडात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून शनिवारी (दि. 20) करोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. मात्र, या कार्यक्रमात मराठा संघटनांमधील हेवे-दावे प्रकर्षाने जाणवले. स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांना व्यासपीठावर बोलावण्यात आले नाही, असा आरोप करत काही कार्यकर्त्यांनी स्टेजवर जाऊन गोंधळ घातला. या कार्यक्रमाला विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी यांची प्रमुख उपस्थिती होती. विशेष पोलीस महानिरीक्षक आणि महिला पदाधिकाऱ्यांच्या समोर शिवीगाळ आणि आरोप प्रत्यारोप करण्यात आले. यावेळी कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकदास चिखलीकर, शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ए. एस. नरोटे यांची उपस्थिती होती.
संयोजकावर नामुष्कीची वेळ
सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या कार्यक्रमात गोंधळ उडाल्याने संयोजक डॉ. अंकुश देवसरकर यांना मात्र तोंडघशी पडावे लागले. व्यासपीठावर निमंत्रित केले नाही म्हणून स्वाभिमानी संभाजी ब्रिग्रेडच्या कार्यकर्त्यानी गोंधळ घातला. यामुळे संयोजकांना खजील व्हावे लागले.
कोरोना नियमावलीचे उल्लंघन
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आणि वाढते रुग्ण लक्षात घेता राज्यसरकारने शिवजयंती साजरी करताना नियम आणि अटी घातल्या होत्या. 100 लोकांच्यावर गर्दी कार्यक्रमात जमवू नये, अशी अट देखील घालण्यात आली होती. या कार्यक्रमात लोकांची गर्दी पाहायला मिळाली.
हेही वाचा - नांदेड जिल्ह्यात 'लॉकडाऊन' नाही, जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण