नांदेड - लोकसभा निवडणुकीचे मतदान संपताच नांदेड महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू होती. पक्षश्रेष्ठींनी राजीनामा देण्यासाठी आदेश दिले होते. त्यानुसार बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत महापौर शीला भवरे यांनी आयुक्तांकडे राजीनामा दिला आहे. तर उपमहापौर विनय गिरडे पाटील यांच्यावरील राजीनामा देण्याचे संकट तुर्तास टळले आहे.
महापौर यांची निवड करताना सव्वा वर्ष असा कालावधी महापौर व उपमहापौर यांचा ठरला होता. त्यानुसार कार्यकाळ संपल्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून राजीनामा देण्यासंदर्भात चर्चा सुरू होती. दरम्यान गुरुवारी रात्री पक्षश्रेष्ठींशी चर्चा झाल्यानंतर महापौर शिला भवरे यांचा राजीनामा देण्याचे ठरले. मात्र उपमहापौर विनय पाटील गिरडे यांचा राजीनामा घेण्यात आला नाही. ते आपल्या पदावर सध्या तरी कायम आहेत.
नियमानुसार महापौर पदाचा राजीनामा विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात येईल व त्यानंतर नव्या महापौर पदाची निवड व त्याची प्रक्रिया सुरू होईल, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे. आता नव्या महापौरपदासाठी अनेकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
शीला भवरे यांनी आपल्या राजीनाम्यानंतर मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांनी गेल्या सतरा महिन्यात केलेल्या कामाचा आढावा दिला. शहरातील स्वच्छता, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, रस्त्याचे डांबरीकरण, राजर्षी शाहू महाराजांचा पुतळा, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा आपल्या काळात उभारण्यात आला, याबद्दल धन्यता मानत असल्याचे सांगितले. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण आपल्या पदाचा वापर केला, असे त्या म्हणाल्या. माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण, आ.डी.पी.सावंत, आ.अमर राजूरकर, आ.अमिता चव्हाण तसेच सभागृहातील सर्व सदस्यांच्या पाठबळामुळेच आपण गेली सतरा महिने शहराच्या विकासासाठी योगदान देऊ शकलो, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
महापौरांच्या राजीनाम्यानंतर सभागृहनेते विरेंद्रसिंग गाडीवाले, अब्दुल सत्तार, शेख फारुख, बापूराव गजभारे, विरोधी पक्षनेत्या सोढी, संगीता पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करुन त्यांच्या कार्यकाळात चांगली कामे झाल्याचा दावा केला.