नांदेड - वीरपत्नीला अपमानास्पद वागणूक दिल्याचा धक्कादायक प्रकार शहरात घडला आहे. वीरपत्नी आपल्या मुलीला चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी इच्छुक होती. मात्र, तिच्या मुलीला प्रवेश तर मिळाला नाही. उलट तिला अपमानास्पद वागणूक देण्यात आली. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून हुतात्मा संभाजी कदम यांच्या मुलीला प्रवेश मिळवून दिला आहे.
देशासाठी हुतात्मा झाल्यावर राजकीय नेते, कार्यकर्ते सर्व येतात. ते हुतात्म्यांच्या कुटुंबाचे सांत्वन करतात. मात्र, पुढे या कुटुंबाचे काय होते याकडे कुणीही लक्ष देत नाही. जिल्ह्यातील एका हुतात्म्याच्या वीरपत्नीला असाच अनुभव आला आहे. मागील दोन वर्षांपासून मुलीला शाळेत प्रवेश मिळावा यासाठी शीतल कदम प्रयत्न करत होत्या. मात्र, विविध कारणे देत त्यांना प्रवेश नाकारला जात होता. या कटू अनुभवाने आता ही वीरपत्नी उद्विग्न होऊन माझे पती विनाकारण देशासाठी हुतात्मा झाले, अशी त्यांची भावना झाली आहे.
शीतल यांचे पती काश्मीरमधील नागरौटा येथे २९ नोव्हेंबर २०१६ ला हुतात्मा झाले होते. बेस कॅम्पमध्ये असलेल्या सर्व सहकाऱ्यांचे प्राण संभाजी कदम यांच्यामुळे वाचले होते. मात्र, यात संभाजी स्वतः हुतात्मा झाले. या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालून वीरपत्नीला न्याय मिळवून दिला. हा प्रकार समोर आल्यानंतर तत्काळ बैठक घेऊन संबंधित शाळेला प्रवेश देण्याचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा- नांदेडमध्ये खंडणीबहाद्दरावर गुन्हा दाखल