नांदेड - माहेरून पैसे आणत नाही म्हणून बनावट प्रेमपत्र पाठवून विवाहितेचे खोटे प्रेमप्रकरण दाखवून छळ करणाऱ्या सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना हस्तरा (ता. हदगाव) येथे घडली असून हदगाव पोस्ट कार्यालयामुळे बनावट प्रेम पत्राचा प्रकार उघडकीस आला आहे.
पीडितेचा २४ फेब्रुवारी, २०१५ रोजी नांदेड येथील मचिन बनचरेसह हस्तरा येथे झाला होता. महिनाभर चांगले वागविल्यानंतर पती, सासू, सासरे, नणंद यांनी माहेरहून पाच लाख आणण्याचा तगादा लावला. दरम्यान पीडीतेच्या माहेरच्या नातेवाईक सासरच्या लोकांना भेटले असता तूमच्या मुलीचे प्रेम प्रकरण असून तिच्या प्रियकराचे पोस्टाने प्रेमपत्र आले आहे. यामुळे आम्ही तिला नांदवणार नाही, असे सांगून प्रेमपत्र दाखवले. परंतु आपले कोणाशीच प्रेम प्रकरण नाही, असे पीडिता म्हणाली.
प्रेमपत्रावर हदगाव पोस्ट कार्यालयाचा शिक्का होता. त्याची तपासणी केली असता तो बनावट असल्याचे लेखी पत्र हदगाव पोस्ट कार्यालयास दिले. सासरच्या लोकांनी ५ लाख रुपयांची मागणी करत चारित्र्यावर शिंतोडे उडविल्याने हदगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार देण्यात आली आहे. या प्रकरणी हदगाव पोलीस ठाण्यात पीडितेच्या पती सचिन बनचरे, सासरा हरिप्रसाद बनचरे, सासू सरस्वती बनचरे, नणंद मनीषा बनचरे या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.