नांदेड Maratha Youth Suicide : जिल्ह्य़ातील नायगाव तालुक्यातील भोपाळ इथल्या इयत्ता 10 वीत शिकत असलेल्या 16 वर्षीय विद्यार्थ्यानं मराठ्यांना आरक्षण देण्यात यावं असं लिहून आत्महत्या केलीय. ओमकार आनंदराव बावणे असं आत्महत्या करणाऱ्या मराठा विद्यार्थ्याचं नाव आहे. तो धुप्पा इथल्या संत ज्ञानेश्वर विद्यालयात शिक्षण घेत होता.
चिठ्ठित काय लिहिलंय : सध्या शाळांमध्ये दहावी बोर्ड परिक्षा फिस भरणे चालू आहे. वडिल गावात त्यांच्याकडं अत्यल्प शेतजमीन असल्यामुळं मोलमजुरी करुन कुटुंब चालवतात. वडिलांकडून परीक्षा फिस, शालेय साहित्य पुरवण्यासाखी कौटुंबिक परिस्थिती नसल्यानं या विषयी कुटुंबात गेल्या बर्याच दिवसांपासून सातत्यानं चर्चा करायचा. आपल्या समाजाला शासन आरक्षण का देत नाही. आरक्षण नसल्यामुळंच आपली व आपल्या समाजाची ही परिस्थीती झालीय, असं तो कुटुंबातील सदस्यांशी बोलत होता. शेवटी या नैराश्यातून त्यानं मराठा आरक्षण व आपली कौटुंबिक परिस्थिती लिहून आपली जीवनयात्रा संपवली.
घोषणांनी परिसर दणाणला : ही घटना रामतीर्थ पोलिस हद्दीतील भोपाळ गावी रविवार दिनांक 22 ऑक्टोबरला सायंकाळच्या सुमारास घडली. घटनेची माहिती कळताच रामतीर्थ पोलीस घटनास्थळी पोहोचली. ओमकार याचा मृतदेह हा नायगाव ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. ओबीसीमधून आरक्षण देऊन त्याच्या कुटुंबियांना 50 लाखाची अर्थिक मदत व कुटुंबातील एकास शासकीय सेवेत सामावून घेतलं जाणार नाही, तोपर्यंत शवविच्छेदन करु देणार नाही, असा कुटुंबानं निर्णय घेतला. यावेळी नायगाव रूग्णालय परिसर मराठा आरक्षण व ओमकार बावणे आमर रहेच्या घोषणांनी मराठा आंदोलकांनी दणाणला आहे.
नांदेड जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी 24 तासांत दोन आत्महत्या : मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी नांदेड जिल्ह्यात 24 तासांत दोन बळी गेले. रविवारी पहाटे हदगाव तालुक्यातील वडगाव तेथील 24 वर्षीय तरुण शुभम पवार यानं आत्महत्या केली होती. तर रात्री शुभमच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शुभमच्या चितेची आग थंड होण्यापूर्वी आणखी एकानं नांदेडमध्ये आत्महत्या केली. नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील भोपाळ इथं एका शालेय विद्यार्थ्यांनं आत्महत्या केलीय. या दोन आत्महत्यांमुळं नांदेड जिल्हात मराठा आरक्षण आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
- Eknath Shinde On Maratha Reservation : मराठा आरक्षणावर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य, आरक्षण देणार पण...
- Maratha Reservation Protest : एकच मिशन, मराठा आरक्षण.. आरक्षण जालन्यातील 245 गावांत राजकीय पुढाऱ्यांना 'गावबंदी'
- Maratha Youth Suicide : मराठा आरक्षणासाठी तरुणानं संपवलं जीवन; नांदेडच्या घटनेनं राज्यभरात खळबळ