नांदेड : Maratha Kranti Morcha: राज्यात दिवसेंदिवस मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) विषय तीव्र होताना दिसत आहे. नांदेडात आरक्षणाच्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी बस अडवली. प्रवाश्यांना खाली उतरवलं आणि पेट्रोल टाकून बस पेटवून (Bus Burned Down Near Nanded) दिली. यामुळे आता नांदेडात पुन्हा एकदा आंदोलक आणि सरकारमधील तणाव वाढताना दिसून येत आहे. मराठा आरक्षणाची मागणी करत जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उपोषण सुरु केलं आहे. याचे पडसाद आता राज्यभर पहायला मिळत आहेत.
नांदेड हैदराबाद महामार्गावरील वाहतूक ठप्प : नांदेड जिल्ह्यात मंगळवारी नायगाव तालुक्यात चक्का जाम करण्यात आला होता. यामुळे नांदेड हैदराबाद महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. आता पुन्हा एकदा मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या तरुणांनी आक्रामक भूमिका घेतली आहे. ही माहिती मिळताच पोलीस अधीक्षक कृष्णा कोकाटे यांनी घटनास्थळांची पाहणी केली. यामुळे आता जिल्ह्यात पुन्हा आंदोलन चिघळू नये, म्हणून पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे.
पेट्रोल टाकून पेटवली बस : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं, या मागणीसाठी सध्या राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाची धग नांदेड जिल्ह्यात कायम आहे. याच पार्श्वभूमीवर नांदेड-मालेगाव रस्त्यावर अज्ञातांनी पेट्रोल टाकून बस पेटवून दिली. ३० ते ४० प्रवासी या बसनं प्रवास करत होते. हा प्रकार नांदेड ते मालेगाव रोडवर (Malegaon Nanded Road) कासारखेडा ते डौर दरम्यान मंगळवारी रात्री घडला. वसमतहून नांदेडकडं जाणारी एसटी क्रमांक (एम. एच. २० बी. एल. ११४६ ) बस नेहमीप्रमाणं रात्री आठ वाजताच्या सुमारास मालेगाव मार्गे जात होती. अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मालेगाव ते कासरखेडा रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या पुलाजवळ अज्ञातांनी सदर बसला थांबवून प्रवाशांना उतरण्याची विनंती केली. प्रवासी उतरल्यानंतर दगडफेक करण्यात आली. त्यानंतर या आंदोलकांनी प्रवाशांना खाली उतरुन बस पेटवून दिल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
मराठा आरक्षणासाठी पेटवली बस : घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक खंडेराय धरणे, नांदेड ग्रामीण उपविभागाचे सहायक हुसेन यांनी भेट दिली. यावेळी गोहर पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक दीपक मस्के, पोलीस उपनिरीक्षक कपिल बुध्देवार, हवालदार पप्पू चव्हाण, महेंद्र डांगे यांच्यासह अनेकांनी पेटलेली बस विझवण्यासाठी प्रयत्न केले. पोलिसांचे पथक व अग्निशामक गाडी वेळीच दाखल झाली. तसेच परिसरातील नागरिकांनी मदत कार्य केलं. सदर बस पेटवून देण्याचा प्रकार हा मराठा आरक्षणासाठी अज्ञातांनी केला असावा, असा संशय पोलीस सूत्रांनी व्यक्त केला आहे. घटनेची माहिती समजताच नांदेड आगारातील एसटी महामंडळाचे अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत.
हेही वाचा -
- Maratha Reservation : 500 ट्रॅक्टरसह आंदोलक मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी रवाना ; पहा व्हिडिओ
- Arjun Khotkar On Manoj Jarange Patil : समाजाचं भलं करायचं असेल, तर काही गोष्टी ऐकाव्या लागतात... अर्जुन खोतकर
- Maratha Reservation Protest : मराठा आंदोलक आक्रमक; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासोबत रात्री उशिरा 'खलबतं'