नांदेड - पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन मित्राचा गळा आवळून खून करून मृतदेह एका शेतात फेकून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलीसांनी या प्रकरणी दिलीप मिटकर नावाच्या आरोपीस अटक केली आहे.
इस्लापूर येथील श्रीरंग पिराजी पवार यांनी मुलांच्या शिक्षणासाठी भाग्यनगर जवळील इंद्रप्रस्थ इमारतीत एक फ्लॅट भाड्याने घेतला होता. त्या ठिकाणी पत्नी, मुलगा तुषार व मुलगी हे तीघेजण राहत होते. शनिवारी दुपारी तुषार हा खाजगी शिकवणीसाठी घरातून बाहेर पडला, मात्र, सायंकाळपर्यंत तो घरी परत आला नाही. त्याचा मोबाईलही बंद येत होता. तुषारची आई अनुराधा यांनी त्याचे वडील श्रीरंग पवार यांना फोनवर याबाबत माहिती दिली. लगेचच श्रीरंग पवार हे इस्लापूर येथून नांदेडमध्ये दाखल झाले. पवार यांनी तुषारच्या मित्राला सोबत घेवून त्याचा सर्वत्र शोध घेतला, परंतु तो कुठेही सापडला नाही. दरम्यान, श्रीरंग पवार यांनी भाग्यनगर पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली. पोलीसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत तुषारच्या मोबाईलची कॉल डिटेल्स घेतली. पोलीसांनी शहरातील काही भागात जावून सीसीटीव्ही फुटेज तपासले. यावेळी तुषारच्या मोबाईलवर शेवटचे ४ कॉल दिलीप बळीराम मिटकर याचे असल्याचे समजले.
हेही वाचा - नांदेड : आरटीओ एजंटच्या कार्यालयात दुचाकीस्वारांचा गोळीबार, बाफना परिसरातील घटना
या प्रकरणात पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक दत्तराम राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिरुध्द काकडे व पोलीस कर्मचाऱ्यांनी दिलीप मीटकरला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने तुषार पवारचा गळा आवळून हत्या केल्याचे सांगितले. तसेच मृतदेह पोत्यात भरून मित्र विजय जाधव रा.घुंगराळा यांच्या मदतीने काकांडी शिवारात फेकून दिल्याचेही सांगितले. दिलीप मिटकर याचे काही दिवसांपूर्वीच लग्न झाले होते. तुषारचे माझ्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय मला होता. त्यामुळे मी त्याचा खून केल्याची कबुली दिलीप मिटकर याने दिली आहे.
हेही वाचा - नांदेड: अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्याने केली आत्महत्या; कारण अस्पष्ट