नांदेड - जगभरात सध्या कोरोना विषाणूचा कहर पाहायला मिळत आहे. त्यामुळेच सर्वच स्तरांतून कोरोना विरोधातील लढ्यात योगदान दिले जात आहे. कोरोनाची लस शोधण्यासाठी जगभरातील अनेक वैज्ञानिक आणि संशोधक आपले प्रयत्न कसे यशस्वी होतील, यासाठी जीवापाड मेहनत घेत आहेत.
यातच कोरोना लसीचा प्रयोग करण्यासाठी आपले शरीर देण्याची तयारी नांदेडमधील एका व्यक्तीने दाखवली आहे. मुखेड तालुक्यातील खरब खंडगाव येथील नारायण गायकवाड यांनी तसे पत्र जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लिहिले आहे.
हेही वाचा... उपचाराचे पैसे न दिल्याने ८० वर्षांच्या रुग्णाला बांधले बेडला; मध्यप्रदेशातील धक्कादायक घटना
कोरोना विषाणू या महामारीने आजवर अनेकांचा जीव घेतला आहे. त्यामुळे यावर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणत्या तरी औषधाची तसेच लसीकरणाची नितांत आवश्यकता आहे. विविध देशातील अनेक वैज्ञानिक या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य ते औषधोपचार तसेच लस तयार करण्यासाठी संशोधन करत आहे. मात्र, जर कोरोनाची लस तयार झाली असेल अथवा होत असेल आणि अशावेळी याचा प्रयोग करण्यासाठी मानव देहाची गरज असेल, तर 'जगाच्या कल्याणासाठी आपण हा धोका पत्करायला तयार असल्याचे' नारायण गायकवाड यांनी पत्रात नमूद केले आहे.
मुखेड तालुक्यातील खरब खंडगाव येथील नारायण काळबा गायकवाड यांनी मुख्यमंत्री यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'कोरोना विषाणूमुळे (कोविड-19) होत असलेला प्रादुर्भाव टाळण्यासाठी तत्काळ लस विकसित करण्याचे संशोधन काम हाती घेण्यात आले आहे. यात संशोधन प्रकल्पासाठी पुणे राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेला मानवाची किंवा माकडाची गरज आहे, असे मी एका वर्तमानपत्रातील बातमीत वाचले आहे. या बातमीच्या आधारे मी स्वतःवर या लसीचा प्रयोग करण्यासाठी शासनाला माझे शरीर देण्यास तयार आहे,' असे नारायण गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.