नांदेड - माळेगावची खंडोबा यात्रा रद्द करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. करोना आणि लम्पीस्किन आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हा परिषदेने हा निर्णय घेतला. सोमवारी पत्रक काढून हा निर्णय जाहीर करण्यात आला. या निर्णयामुळे यात्रेत येणाऱ्यांचा मात्र, हिरमोड झाला आहे. फक्त देवस्वारी (पालखी सोहळा) ला परवानगी देण्यात आली आहे.
दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा -
दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून माळेगावची यात्रा प्रसिद्ध आहे. या यात्रेला दर वर्षी लाखो भाविक हजेरी लावतात. हौसे, गौसे आणि नवश्याची यात्रा म्हणून माळेगावची यात्रा प्रसिद्ध आहे. विविध प्राण्यांसह, घरगुती वस्तू याठिकाणी खरेदी विक्रीसाठी येतात. महाराष्ट्रासह, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्यप्रदेश या राज्यांतून भाविक खंडोबाच्या दर्शनासाठी येथे येतात. घोडे, उंट, गाढव, कुत्रे, यासह अनेक प्राण्यांची खरेदी विक्री या यात्रेत होते. मात्र, यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्हा प्रशासनाने यात्रेवर निर्बंध घातले आहेत.
माळेगाव ग्रामपंचायतीला बसणार आर्थिक फटका -
माळेगाव यात्रेत विविध वस्तू आणि प्राणी यांच्या खरेदी-विक्रीतून मोठी उलाढाल होते. यात्रेवर निर्बंध आणल्यामुळे आता ही यात्रा दरवर्षी सारखी होणार नाही. यामुळे माळेगाव ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या लाखो रुपयाच्या महसुलाला मुकावे लागणार आहे.
जिल्हा परिषदेचेही सर्व कार्यक्रम रद्द -
माळेगाव यात्रेत ११ जानेवारीला देवस्वारी (पालखी सोहळा) होणार आहे. ही पूजा धार्मिक प्रथेनुसार पार पडणार आहे. मात्र, यानंतरचे सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. दरवर्षी जिल्हा परिषदेच्या विविध विभागाचे स्टॉल याठिकाणी लावले जातात. यासोबतच पशु प्रदर्शन, कला महोत्सव, लावणी महोत्सव यासारखे कार्यक्रम जिल्हा परिषदेकडून घेतले जात होते. करोना रोखण्यासाठी शासनाने घातलेल्या निर्बंधांनुसार आता हे कार्यक्रमही होणार नाहीत.