नांदेड - भाजपाच्या ताब्यात असलेली कुंडलवाडी नगरपालिका महाविकास आघाडीने आपल्याकडे खेचून घेतली. आज झालेल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या सुरेखा जिठ्ठेवार विजयी झाल्या. जिठ्ठेवार यांनी भाजपाच्या शेख रेहाना यांचा धक्कादायक पराभव केला. नगराध्यक्ष पदी सुरेखा जिठ्ठेवार यांचे नाव घोषित होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
नांदेड जिल्ह्यातील कुंडलवाडी (ता.बिलोली) नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. अरुणा कुडमुलवार यांना शासनाने जातवैधता प्रमाणपत्राअभावी अपात्र केले. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सदस्यांमधून नगराध्यक्ष पदाची पोट निवडणूक जाहीर केली. त्यानुसार आज झालेल्या पोट निवडणुकीत नगराध्यक्षपदी सुरेखा जिठ्ठेवार यांची निवड झाली.
नगराध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राखीव होते. कुंडलवाडी नगरपालिकेत एकूण 17 सदस्य आहेत. शिवसेनेचे तीन, काँग्रेसचे चार, भाजपाचे दहा सदस्य आहेत. भाजपाचे पुरेसे संख्याबळ असूनही मते फुटल्याने आज झालेल्या सभेत जिठ्ठेवार यांना १० मते व रेहाना बेगम यांना ६ तर एका सदस्यांने कुणालाही मतदान न करता तटस्थ भूमिका घेतल्याने महाविकास आघाडीच्या शिवसेना उमेदवार सुरेखा जिठ्ठेवार यांची निवड झाली आहे. ही निवडणूक सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून आमदार अमरनाथ राजूरकर हे किंगमेकर ठरले आहेत. शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे, आमदार रावसाहेब पंचपिंपळीकर, प्रकाश मारावार, माजी नगराध्यक्ष सुनील बेजगमबार, मनपा नगरसेवक संदीप सोनकांबळे यांनी महत्वाची भूमिका बजावली.