नांदेड : राज्यात सध्या भोंग्यावरून राजकीय वातावरण चांगलच तापलं ( Loudspeaker Controvercy Maharashtra ) आहे. पण एक गाव अस ही आहे की, ज्या गावात भोंगेच ( Loudspeakers Banned In Barad Village Nanded ) नाहीत. नांदेड जिल्ह्यातील हे आहे बारड (ता.मुदखेड) गाव. या गावात कुठल्याच धार्मिक स्थळावर भोंगे दिसणार ( Loudspeakers at a religious place ) नाहीत. 30 जानेवारी 2017 मध्ये बारड ग्रामपंचायतीने गावात भोंगे बंदीचा ठराव घेतला. या ठरावाला सर्वच जाती धर्माच्या लोकांनी होकार दिला. गत 5 वर्षापासून बारड या गावात भोंग्याचा आवाज कधी वाजलाच नाही.
२०१७ मध्ये झाला एकमताने निर्णय : मुदखेड तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून बारड या गावाची ओळख आहे. गावाची लोकसंख्या 10 हजार असून, गावात सर्वच जाती -धर्माचे लोक राहतात. पण भोंग्याच्या आवाजावरून या गावात देखील पूर्वी वाद व्हायचा. पण 2017 मध्ये गावकऱ्यांनी एकत्र येत ठराव घेऊन हा होणारा वाद कायमचा थांबवण्यासाठी भोंगेबंदीचा निर्णय घेतला.
अभ्यासासाठी पोषक वातावरण : गावात भोंगे नसल्यामुळे अभ्यास करण्यासाठी पोषक वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे विद्यार्थीही समाधान व्यक्त करतात. भोंगे नसल्याने गावात ध्वनी प्रदूषण देखील होत नाही. त्यामुळे लहान बालक आणि वृद्धही सुखाची झोप घेऊ शकतात.
किरकोळ वादविवाद थांबले : भोंग्याच्या आवाजाच्या किरकोळ कारणावरून होणारे वादविवाद देखील होत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दरम्यान गावात हिंदू धर्माचे एकूण मंदिरे 8 आहेत. तर मशीद 1 आहे. बौद्ध धर्मियांची श्रध्दास्थळे म्हणजेच बौद्ध विहार 2 आहेत. जैन मंदिर 1 आहे. या सर्वच धार्मिक स्थळावर भोंगे नाहीत. धार्मिक स्थळांसोबतच गावात धार्मिक कार्यक्रम, राजकीय, सांस्कृतिक, आशा कार्यक्रमात देखील भोंगे लावण्यास बंदी आहे. सध्या राज्यात भोंग्यावरून राजकीय वातावरण चांगलाच तापलं असलं तरी, नांदेड जिल्ह्यातील बारड या गावाचा आदर्श घेतल्यास भोंग्यावरून होणारा वाद नक्कीच थांबेल, अशी भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.