नांदेड -1 जूनपासून पाचवा लॉकडाऊन सुरू झाला असून शासनाने घालून दिलेले नियम उमरी शहरातील नागरिकांकडून धाब्यावर बसवले जात असल्याचे चित्र आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील बाजारपेठेसह सर्वच बँकेत मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. बाजारातील प्रत्येक रस्त्यावर दुचाकी वाहने लावलेली दिसून आली.
प्रत्येक नागरिकाने शासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन नगरपालिका प्रशासन वारंवार करत आहे. नागरिक मात्र बाजारपेठेत खुलेआम फिरताना दिसत आहेत. ग्रामीण व शहरी भागातील खातेदार बँक खात्यातील रक्कम काढण्यासाठी सर्वच बँकेत गर्दी करत आहेत. यामुळे शारीरिक अंतर राखण्याच्या नियमांचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे.
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्यावतीने व्यापाऱ्यांना नियमांचे पालन करत सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत दुकाने उघडण्यास मुभा दिली आहे. परंतु, किराणा, आडत, भाजीपाला, सराफा, कापड, जनरल स्टोअर्स, फळ विक्रेते, इलेक्ट्रॉनिक दुकाने, कृषी सेवा केंद्र, मोबाईल शॉपी, देशी व विदेशी दारूची दुकाने, बियर बार व धाबे सुरु झालेत. यामुळे इतर बाजारपेठाही गर्दीने फुलल्या आहेत.
बाजारपेठेत लहान मुले व महिलांची ही गर्दी वाढली आहे. उमरी शहरात चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने दोन दिवस उमरीची बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली होती.