नांदेड - हदगाव तालुक्यात अन्न नसल्याच्या तणावात एकाने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आलाय. राजू बाभूळकर (वय-40) असे मृताचे नाव असून त्याने गळफास घेत स्वत: ला संपवले.
दगड फोडून उपजीविका करणारा राजू हाताला काम नसल्याने अस्वस्थ होता. लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर सर्वत्र कारखाने व उद्योग बंद झाले. यामुळे मजूर आणि कामगारांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. रोजंदारीवर काम करत असल्याने कामगारांचा रोजगार गेला. तसेच कामे बंद झाल्याने त्यांच्यासमोरील आर्थिक उत्पन्नाचे पर्याय देखील संपले. यानंतर मजुरांच्या जेवणाचे हाल होत आहेत.
बाभूळकर यांचे मुंबईत वास्तव्यास असणारे कुटुंब हदगावला परतले होते. स्वत: च्या अन्नाची भ्रांत असताना कुटुंबाला कसे पोसायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. यामुळे आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे मृताच्या मुलीने सांगितले. या घटनेने हदगाव शहरात हळहळ व्यक्त होत आहे. संबंधित आत्महत्येप्रकरणी हदगाव पोलीस तपास करत आहेत.
नैराश्यातून उचलले पाऊल...
बाबाने कोरोनामुळे नाही, तर घरात खायला अन्न नसल्याने आत्महत्या केल्याचे त्यांच्या मुलीने म्हटले आहे. घरातील अन्नधान्य संपले होते. खाण्यासाठी पर्याय शोधण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, अशातच वडिलांनी गळफास लावून घेतला.