नांदेड- सध्या जिल्ह्यात हळद काढणीने वेग घेतला आहे. हळद काढणीसाठी मोठ्या प्रमाणात मजुरांची गरज असते. ऊसतोड मजूरासारखा मोठा रोजगार देणार साधन म्ह्णून या पिकाकडे पाहिले जात आहे. मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर नांदेड जिल्ह्यात हळद काढणीसाठी मजूर दाखल झाले आहेत. गतवर्षीही ऐन कोरोनाच्या काळात हातावर पोट असणाऱ्या मजुरदाराना याच हंगामाने तारले होते. यंदाही परिस्थिती वेगळी नाही. हळद काढणीसाठी मोठ्या प्रमाणात मजूर नांदेड जिल्ह्यात दाखल झाले आहेत.
हेही वाचा- बर्निंग ट्रेनचा थरार; दिल्ली-डेहरादून एक्सप्रेसच्या डब्याला भीषण आग
मजूरांना मिळते भरपूर काम
अर्धापूर तालुक्यासह परिसरात मजूरांना भरपूर काम मिळते. म्हणून हे कामगार विदर्भातील पुसद, महागाव, यवतमाळ, आर्णी, उमरखेड तालुक्यासह विविध तालुक्यातून नांदेड जिल्ह्यात मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. अर्धापूर तालुक्यातील भौगोलिक परिस्थिती बागायती असून मोठ्या प्रमाणावर केळी, ऊस, हळद, गहू, हरभरा अन्य पिकाची लागवड केली जाते. हळद, गहू आणि हरभरा पिकांची काढणी फेब्रुवारी ते मार्च महिन्यात सुरुवात होते. हळद, गहू आणि हरभरा पिकाची काढणी एकाच वेळी आल्याने मोठ्या प्रमाणात मजूरांची कमतरता भासते. याकरिता शेतकरी जादा पैसे देऊन पिकांची काढणी करीत आहेत. गेल्या काही वर्षापासून इतर जिह्यातील कामगार परिसरात येऊन हळद काढून आपला उदरनिर्वाह करतात. तसेच गहू, हरभरा व उन्हाळी ज्वारीची कापणी करून धान्य जमा करूनही घेऊन जात असतात.
मजूरदार मिळत नसल्याने शेती अडचणीत
शेती करताना मजूराची जास्त गरज भासत असते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून शेतीमध्ये काम करण्यासाठी मजूरदार मिळत नसल्याने शेती धोक्यात आली आहे. मजूरांना भरपूर पैसे देऊन सुद्धा कामगार मिळत नाहीत. मजूरांच्या अडचणीमुळे शेतीमधील कामे ठप्प पडत आहेत. पिकांच्या लागवडीपासून ते पिकांच्या काढणीपर्यंत महिला मजूरांची आवश्यकता असते. मात्र महिला मजूरदार मिळत नसल्याने शेतकरी अन्य मार्गाने पिकामधील कामे करीत आहेत. तणनाशकाचा वापर करावा लागतो. यामुळे जमिनीचा कस कमी होत आहे . एकीकडे काम मिळत नाही म्हणून मजूर अडचणीत असतो तर दुसरीकडे मजूर मिळत नाही म्हणून शेतकरी अडचणीत असतो. त्यामुळे मजूरांच्या येण्यामुळे एकमेकांना आधार मिळत आहे.
हेही वाचा- बदनामीच्या भीतीने झाली रेखा जरेंची हत्या; पोलीस अधीक्षकांची माहिती